Breaking News

गोवेले येथील शिवकालीन गणपती मंदिर

माणगाव तालुक्यातील गोवेले हे गाव गर्द हिरव्यागार झाडीत वनराईच्या सानिध्यात असून तेथील गणपती मंदिर पेशवेकालीन आहे व मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.

पुरातत्त्व खात्यामध्ये हे मंदिर पेशवेकालीन असावे अशी नोंद आहे, कारण श्रीमंत पेशव्यांचे श्रीवर्धन हे जन्मगाव असून ते गोवेले याचमार्गे श्रीवर्धनला जात असत. त्या वेळी पेशव्यांनी या मंदिराची स्थापना करुन कालांतराने तेथे मंदिर बांधण्यात आले. काही काळ येथील मंदिरातील दिवाबत्तीसाठी सरकारी निधी मिळत असे, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. या गणेशाची मूर्ती सुबक व आकर्षक आहे. मूर्ती पाषाणाची असून डाव्या सोंडेचा हा गणेश हाकेला नेहमीच धावतो.

गोवेले गावाला शिवरायाची भूमी म्हणून ओळखले जात असून शिवरायांची पुरातन शिल्पेही येथे पहावयास मिळतात तसेच या मंदिराच्या गाभार्‍यातून रायगडाचे सहज दर्शन होते. म्हणूनच काही लोकांच्या मते हे मंदिर शिवकालीन आहे. सन 2009मध्ये गोवेले ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेव्हापासून येथे माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये या गावातील तरुण तसेच वयोवृद्ध मुंबईकरांना व ग्रामस्थांना हरिनामाचे वेध लागतात. गावातील होतकरू व मुंबईतील मंडळी वेगवेगळी कमिटी स्थापन करून या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवितात.

मंदिर गावालगतच्या छोट्या टेकडीवर आहे. या गावाची नवलाई म्हणजे चार दिवस हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते व या चार दिवसांत गावातील कोणाच्याही घरी चूल न पेटता सर्वांच्या भोजनाची सोय या गणेश मंदिरात केली जाते.

दिवस-रात्र देवाचे ध्यान करण्यात हे ग्रामस्थ तल्लीन असतात. दरवर्षी कृष्णनाथ गोसावी यांच्या आशीर्वादाने तसेच दत्ताराम कोलाटकर यांच्या सौजन्याने या सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण केले जाते. पहाटे काकड आरतीपासून ज्ञानेश्वरक पारायण, हरिपाठ, हरिजागर, प्रवचन, सत्यनारायण महापुजा, काल्याचे कीर्तन, महाप्रसाद, ज्ञानेश्वर माऊली पालखी मिरवणूक असे विविध प्रकारचे भरगच्च कार्यक्रम या मंदिरात आयोजित केले जातात.

दक्षिण काशी व पर्यटनस्थळ असलेले हरिहरेश्वर येथे जातेवेळी भाविक व पर्यटक याच गोवेलेमार्गे जाऊन गणपतीचे दर्शन घेतात. असे हे शिवकालीन गणपती मंदिर सर्वांना आकर्षित करून घेत आहे. एकदा तरी येथे जरूर भेट द्या.

-सलीम शेख, माणगाव

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply