Breaking News

सुधागडात शस्त्रास्त्रे आणि युद्धकलेची जोपासना

पाली ः प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचे देदीप्यमान शौर्य साडेतीनशे वर्षांनंतरही जनतेच्या तनामनात आहे. शिवरायांच्या याच रोमहर्षक व थरारक शस्त्रास्त्र व युद्धकलेची माहिती सर्वसामान्यांना व प्रामुख्याने तरुण व लहानग्यांना मिळावी आणि त्यांना या कलेचे प्रशिक्षण मिळून स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत यासाठी रायगड जिल्ह्यात विविध संस्था व व्यक्ती शिवकालीन शस्त्रास्त्रे व युद्ध कलेची जोपासना करत आहेत. त्यासाठी प्रात्यक्षिके दाखवितात याबरोबरच प्रशिक्षण देखील देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुण व लहान मुले-मुली ही शस्त्रास्त्रे कला

अंगीकारत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून मावळ्यांना शारीरिक व्यायामाचे व युद्धकलेचे महत्त्व पटवून दिले. सुधागड तालुक्यातील जय हनुमान आखाडा शिळोशी हे याच शिवकालीन शस्त्रास्त्रे व युद्धकलेच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मुलांना देत आहेत. या मंडळाचे अध्यक्ष शरद गोळे हे शिवकालीन कलेचे संवर्धन व्हावे, सर्वसामान्यांना ती कळावी व या केलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. मागील 20 वर्षांपासून कै. भिकू दंत यांच्या प्रेरणेतून जय हनुमान आखाडा मंडळ व गावातील तरुण ही कला जोपासण्यासाठी मेहनत घेत आहेत. या आखाड्यात चार-पाच वर्षांच्या मुलांपासून ते अगदी 40 ते 50 वयोगटातील नागरिकदेखील आहेत. या मंडळाने रायगड जिल्ह्यातील रोहा, कर्जत, खालापूर आदी विविध तालुक्यांमध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन केले आहे.

श्रीवर्धनमधील शैलेश ठाकूर यांनी 2005पासून अथक परिश्रम करून विविध शिवकालीन शस्त्र जमा केली आहेत. तलवार, भाला, दांडपट्टा, ढाल, विटा व बाण अशा शस्त्रांचा संग्रह त्यांनी केला आहे. शैलेंद्र ठाकूर सामाजिक कार्याबरोबरच कराटे, मल्लखांब व शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण देतात. शिवचरित्रावर असलेल्या प्रेमातून शिवकालीन शस्त्र जमा करण्याचा छंद ठाकूर यांना लागला आणि शस्त्र जमा करत असताना ती कशी चालवावी या जिज्ञासेपोटी ठाकूर यांनी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांद्वारे व इतर तज्ञांच्या माध्यमातून शिवकालीन युद्धकले विषयी माहिती घेतली आणि या युद्धकलेचे ज्ञान आत्मसात केले. मागील अनेक वर्षांपासून ते या युद्धकलेचे प्रशिक्षण तरुण व युवकांना देत आहेत. त्याचबरोबर विविध उपक्रमात शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके ठाकूर दाखवतात. अशाच प्रकारे जिल्ह्यात काही संस्था, व्यक्ती तसेच शाळांच्या माध्यमातून ही कला जोपासली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील भक्ती व त्यांच्या श्रद्धेतून शिवकालीन युद्धकलेचा अभ्यास केला. तत्कालीन काळातील शस्त्र जमा केली. यासाठी बराच संघर्ष करावा लागला. मुलांसाठी शिवकालीन युद्धकलेचा आखाडा सुरू करणार आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात ही कला कायम टिकून राहिली पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहे.

-शैलेंद्र ठाकूर, शिवकालीन शस्त्रास्त्र व युद्धकला प्रशिक्षक

मागील अनेक वर्षांपासून शिवकालीन शस्त्रास्त्र व युद्धकलेची प्रात्यक्षिके करीत आहे. हा वारसा घरातूनच मिळालेला आहे. असंख्य तरुण व मुले-मुली या कलेचे प्रशिक्षण घेत आहेत. चांगले प्रशिक्षण व योग्य सरावाद्वारे प्रभुत्व मिळविता येते. शारीरिक व मानसिक सुदृढता येते  तसेच महाराजांच्या युद्धकलेची जोपासना होत असल्याने अभिमानदेखील वाटतो.

-श्रीधर गोळे, तरुण, जय हनुमान आखाडा, शिळोशी

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply