कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या सुवर्णा केतन जोशी यांनी सोमवारी (18 फेब्रुवारी) पदभार स्वीकारला. नगराध्यक्ष पदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आपला प्रत्येक दिवस कर्जतकर जनतेच्या सेवेत असेल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. कर्जत नगर परिषद कार्यालयात पोहचण्याआधी महायुतीच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली, मात्र पुलवामा हल्ल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारची वाद्ये आणि बँड यांचा वापर केला नाही. ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देत महायुतीचे कार्यकर्ते नगर परिषद कार्यालयात पोहचले. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी नागरिकांसाठी नगर परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेल्या पत्रपेटीचे उद्घाटन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. त्यानंतर सर्व कार्यकर्ते नगराध्यक्ष पदाच्या दालनात पोहचले. त्या वेळी सुवर्णा जोशी यांचे सासरे जयंत जोशी यांनी त्यांना नगराध्यक्षाच्या आसनावर बसविले. या वेळी प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, उपजिल्हा संघटक सुरेखा शितोळे, युवासेना जिल्हा संघटक मयूर जोशी, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, आरपीआय कोकण सचिव मारुती गायकवाड, नगरसेवक नितीन सावंत, राहुल डाळिंबकर, अशोक ओसवाल, विवेक दांडेकर, स्वामिनी मांजरे, विशाखा जिनगरे, प्रीती डेरवणकर, मोरे, संचिता पाटील यांच्यासह मनोहर थोरवे, राजेश जाधव, दिनेश सोळंकी, भालचंद्र जोशी, अरविंद मोरे, संतोष पाटील, यमुताई विचारे, अरुणा वायकर आदी या वेळी उपस्थित होते.