केंद्रातील मोदी सरकारने कोरोना परिस्थितीनुसार निर्बंधांचा आढावा घेण्याची सूचना राज्यांना केली असून यापुढे काही निर्बंध सुरू राहिल्यास त्यांचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरील आणि विशेषत: उपजीविकेवरील दुष्परिणाम कमीतकमी असेल याची खबरदारी घेण्याची सूचनाही केली आहे. अर्थात कुठलाही निर्णय घेताना गोंधळ घालणारे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार त्या दिशेने काय पावले उचलते ते येत्या काही दिवसांत दिसेलच.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या खाली गेली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणार्या रुग्णांचे प्रमाण या दोन्हीमध्ये दिलासादायक घट दिसत असल्यास कोरोनाप्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल करावेत अशी सूचना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली. आसामने तर मंगळवारीच निर्बंधमुक्ती जाहीर केल्याने निर्बंधमुक्त होणारे ते देशातील पहिले राज्य ठरले. त्यापाठोपाठ हरियाणानेही निर्बंध पूर्णपणे मागे घेतल्याची घोषणा केली. परंतु मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन मात्र तेथे करावे लागणार आहे. कोरोना महामारीच्या संदर्भात गेल्या दोन वर्षांतील बहुतांश काळ देशभरातील सर्वाधिक वाईट परिस्थितीला तोंड देणार्या महाराष्ट्रात निर्बंध शिथिल कधी होणार याचे अंदाज आता व्यक्त होऊ लागले आहेत. जगभरातच सध्या जनजीवन सामान्य किंबहुना पूर्ववत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक देशांमध्ये त्यासाठी आंदोलने, निदर्शने होत आहेत. डेन्मार्क, स्वीडनसारख्या कमी लोकसंख्येच्या देशांनी कोरोनासंबंधी नियम पूर्णत: शिथिल केलेही आहेत. राज्यातील रुग्णसंख्याही कमी होते आहे. यात सातत्य राहिल्यास निर्बंधांमध्ये शिथिलता येऊ शकेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी केले. परंतु सोबतच, मुख्यमंत्री यासंदर्भातील निर्णय घेतील असे म्हणायला ते विसरले नाहीत. तूर्तास अवघा देशच ओमायक्रॉनच्या लाटेतून सावरताना दिसत असून मृतांच्या संख्येतही घट दिसते आहे. पात्र व्यक्तींमध्ये लसीकरणाचे प्रमाणही एव्हाना चांगले दिसू लागले आहे. संभाव्य संसर्गाचा धोका अधिक असणार्यांना बूस्टर डोस दिला जातो आहे. बहुतांश महत्त्वाचे आर्थिक व्यवहार एव्हाना पूर्ववत झाले असून आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरील निर्बंधही हटविण्यात आले आहेत. ओमायक्रॉनची लाट ओसरू लागल्यानंतर आता कोरोना महामारीचा शेवट दृष्टिपथात आला असल्याची भावना बळावू लागली असली तरी जागतिक आरोग्य संघटनेने मात्र कोरोना विषाणूचे नवे उपप्रकार येण्याच्या वाटेवर असू शकतात असा सावधगिरीचा इशारा दिला आहे. ओमायक्रॉन हा विषाणू प्रकार सौम्य असला तरी लोकसंख्या पातळीवरील त्याचे परिणाम दुर्लक्षित करता येणार नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेचे संबंधित इशारे तसेच बूस्टर डोसवरून सुरू असलेले विवाद, पुनर्संसर्गाचा धोका यामुळे जनसामान्य तर गोंधळात आहेतच. परंतु अनेक उद्योगधंद्यांचे चालक व राजकीय नेतेमंडळीही जगणे सामान्य करण्यासंदर्भात नेमका काय निर्णय घ्यावा याच्या पेचात आहेत. जागतिक स्तरावर ही अशी गोंधळाची परिस्थिती दिसत असताना महाराष्ट्रातील सदोदित गोंधळयुक्त निर्णय घेणार्या आघाडी सरकारच्या निर्णयक्षमतेबद्दल बोलायलाच नको. राज्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करावेत असे केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले आहे. बहुतेक तज्ज्ञांनी मास्कचा वापर व सामाजिक अंतर पाळणे हे तूर्तास सुरूच ठेवावे लागेल यावर भर दिलेला असल्याने सर्व संबंधित सूचना विचारात घेऊन मविआ सरकार निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील निर्णय लवकरच घेईल अशी अपेक्षा करूया.