कर्जत : बातमीदार
पनवेल-कर्जत या 29 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर दुसरी मार्गिका टाकण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरु आहे. हे दुहेरीकरणाचे काम 2024मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 2024पासून या रेल्वे मार्गावर उपनगरीय प्रवासी सेवा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत-पनवेल या रेल्वे प्रकल्पाची सुरुवात कोकण रेल्वे बरोबरच पनवेल येथून झाली होती. 2004 मध्ये हा एकेरी रेल्वे मार्ग प्रवासासाठी तयार झाला. मात्र या मार्गावरील वावर्ले-हालिवली या बोगद्यातील मार्गावर कायम दगड कोसळत होते. त्यामुळे रेल्वे मार्गावर उपनगरीय सेवा सुरु होत नव्हती. शेवटी रेल्वे प्रशासनाने मालवाहू गाडी सुरु केली. 2007 मध्ये या रेल्वे मार्गावर नाशिक-पुणे अशी शटल सेवा सुरु झाली. आज अनेक लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या पनवेल-कर्जत मार्गावर धावत आहेत. मात्र उपनगरीय लोकल सुरु झाली नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महानगर लक्षात घेऊन कर्जत-पनवेल एकेरी रेल्वे मार्गावर दुसरी मार्गिका टाकण्याचे काम ट्रान्सहार्बर रेल्वे कॉर्पोरेशनकडून सुरु झाले आहे. जुन्या एकेरी मार्गावर ज्या ठिकाणी उपनगरीय रेल्वेसाठी अडथळे निर्माण होत आहेत, त्या ठिकाणी नवीन मार्ग थोडा वळविण्यात आला आहे. वावर्ले येथील हा मार्ग कर्जतकडे येताना डाव्या बाजूने वळविला आहे. त्यामुळे बोगद्यातील दगड पडण्याच्या घटना नवीन एकेरी मार्गावर उद्भवणार नाहीत, असे रेल्वेच्या अभियंत्यांचे मत आहे. पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम 2024मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि या मार्गावर उपनगरीय सेवा, शटल सेवा सुरु व्हावी अशी प्रवाशांची मागणी आहे.