Breaking News

महाड पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले!

विकासाचा विचार घेऊन महाड नगरपालिकेतील मतदारांनी वेळोवेळी मतदान केले आहे. शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा एक अपवाद वगळता महाड नगरपालिकेत महाडचे शिल्पकार कै. अण्णासाहेब सावंत व त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार कै. माणिकराव जगताप यांचीच एकहाती सत्ता राहिली आहे. सध्या महाड नगरपालिकेची मुदत संपली असून प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. बहुदा येत्या एप्रिलमध्ये महाड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. मावळत्या नगरपालिकेत कै. माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगराध्यक्ष, सरपंच हे थेट जनतेने निवडून द्यायचे, हा निर्णय भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. या निर्णयामुळे नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीच्या प्रक्रियेतला घोडेबाजार बंद झाला होता. जो योग्य आणि गुणवंत असेल तोच हे पद सांभाळू शकेल, तसेच जनतेने निवडून दिलेला असल्याकारणाने अविश्वास आणण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे या स्थानिक संस्थांचा कारभार सुरळीत चालण्यास मदत झाली होती. भ्रष्टाचारदेखील कमी झाला होता, मात्र आघाडी सरकारने हा निर्णय रद्द ठरविल्याने नगराध्यक्षांची निवड आता थेट जनतेतून होणार नाही, तर ती निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होणार आहे. या वर्षी प्रभाग रचनेतही बदल झाला असून महाड नगरपालिकेची सभासद संख्या 17 वरुन 20 झाली आहे. प्रभाग रचना बदलल्यामुळे प्रस्थापित नगरसेवकांचे मनसुबे धुळीत मिळणार आहेत. महाड नगरीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब सावंत यांनी नगरपालिकेला विकासाचा चेहरा दिला. ’क’ वर्ग नगरपालिका असूनही तीस वर्षांपूर्वी सावंतांच्या काळात शहरातील सर्व रस्ते उच्च दर्जाचे, काँक्रिट होते. सुलभ गटार व्यवस्था, कोथुर्डे पाणी योजनेचा विस्तार, अतिरिक्त एमआडीसी, लाडवली पाणी योजना, ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकही रुपयाचा भ्रष्टाचार नाही. अशा अनेक कारणांमुळे कै. अण्णासाहेब सावंत यांना महाड शहराचे शिल्पकार संबोधले जाते. 35 कोटींचे बजेट असलेल्या महाड नगरपालिकेत तत्कलीन मंत्री प्रभाकर मोरे यांचादेखील विकासामध्ये वाटा आहे. सावंतांनंतर या नगरपालिकेची धुरा (कै.) माणिकराव जगताप यांनी आपल्या खांद्यावर घेतली. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेल्या मैत्रीचा त्यांनी विकास निधी आणण्यात चांगला उपयोग करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक बेट निर्मिती करुन शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. नगरपालिका शाळा इमारतीची निर्मिती, गटारांचे रुंदीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली. 22 जुलैच्या महापुरात जेव्हा सर्व शासकीय कार्यालये पाण्याखाली गेली होती, तेव्हा याच इमारतीचा महाड बचाव व मदतकार्यासाठी शासकीय कार्यालयांना आधार मिळाला होता. महाड नगरपालिकेच्या 2017च्या निवडणुकीत माणिकरावांनी आपली मुलगी स्नेहल जगताप यांना थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आणून एक हातीसत्ता कायम ठेवली, मात्र कोरोने त्यांच्यावर डाव टाकला आणि जेव्हा महाड महापुरात बुडाले होते अशा संकटाच्या काळात माणिराव हे जग सोडून गेले. त्यानंतर आघाडी सरकारकडून महाडकरांची उपेक्षा झाली. महापुरानंतर भाजपकडून जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महाडकरांना मदतीचा हात देण्यात आला. त्यांनी नागरिकांना मोठा आधार दिला. मध्यंतरीच्या काळातील शिवसेनेची सत्ता आणि काही काळासाठी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष वगळता महाड नगरपालिकेत माणिकरावांची एकहाती सत्ता होती. एकेकाळी नगरपालिकेच्या सभागृहात भाजपचे दोन नगरसेवक होते. 2017च्या निवडणुकीत शिवसेनेचे 17 पैकी पाच नगसेवक निवडून आले होते आणि त्यावरच त्यांना समाधान मानावे लागले होते. एप्रिल 2022मध्ये महाड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्यात जरी महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी महाड नगरपालिका निवडणूक हे तिनही पक्ष स्वतंत्रपणे लढवण्याची शक्यता आहे. या तीन पक्षांसोबतच भाजप आणि मनसेदेखील रिंगणात असणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जर भाजप, मनसे युती झाली, तर ती युती महाडमध्येदेखील होऊ शकते आणि त्याचा चांगला निकाल येऊ शकतो तसेच शिवसेनेला शह देण्यासाठी आणि राष्ट्रवादीला रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष या वेळी भाजपसोबत युती करू शकतो व तसे झाल्यास जगतापांची सहानुभूती आणि भाजपचे हिंदूत्व ही ताकद दोघांना पुन्हा सत्ता मिळवून देऊ शकते. खासदार सुनील तटकरे यांची खेळी महाड नगरपालिकेचे चित्र बदलू शकते असा काही जणांचा अंदाज आहे, तर आमदारकी माझी आणि नगरपालिका तुमची या बोलीवर काँग्रेस आणि शिवसेनेची अंतर्गत छुपी युती होऊ शकते. 20 नगरसेवक असलेल्या आणि 35 कोटींचे बजेट असणारी ही नगरपालिका आपल्याकडे ठेवण्यात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात खरी लढत असली तरी भाजपचा प्रभाव हा या दोघांच्याही मान्य करावा लागत आहे. मनसेलाही आपल अस्तित्व टिकविण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय दिसत नाही. पुढे काय होते हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

-महेश शिंदे

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply