Breaking News

शेतकर्‍यांच्या वीजतोडणीला तात्पुरती स्थगिती

भाजपच्या आक्रमक पवित्र्यानंतर ऊर्जामंत्र्यांची घोषणा

मुंबई ः प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरत असून शेतकर्‍यांच्या वीजतोडणीवरून विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 15) सरकारला धारेवर धरले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने वीजतोडणीसंदर्भात निर्णय घेतला आहे. पीक हातात येईपर्यंत पुढील तीन महिने शेतकर्‍यांची वीजतोडणी तात्पुरती थांबवण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधासभेत केली. विरोधी पक्ष भाजपने विधिमंडळात सकाळपासून शेतकर्‍यांच्या वीजतोडणीचा मुद्दा लावून धरला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही वीजतोडणीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहात दोन्हीकडच्या आमदारांनी सावकारी-सुल्तानी पद्धतीने शेतकर्‍यांची वीज कापण्याच्या सरकारच्या धोरणाचा निषेध केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या अधिवेशनात मे महिन्यापर्यंत शेतकर्‍यांची वीज कापणार नाही, असे म्हटले होते. मग दिलेल्या आश्वासनाची पूर्तता का होत नाही? काल सरकारने सभागृहात वीजतोडणीसंदर्भात चर्चा घेण्याचे मान्य केले, मात्र आज कामकाज सुरू झाल्यानंतर वेगळ्याच मुद्द्यावर चर्चेला सुरुवात केली. त्यामुळे राज्य सरकारला शेतकर्‍यांविषयी कुठलीही संवेदना राहिलेली नाही, हे स्पष्ट होत आहे. सरकारने वीजतोडणी तातडीने थांबवावी. अन्यथा आम्ही हा विषय सभागृहात लावून धरू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे सुरू झाले. चर्चा कसली करता. याचे श्रेय कोणालाच नको. शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. परवा एक आत्महत्या झालाय. आज एक झाली. आत्महत्या होतच आहेत. त्यामुळे चर्चा नको तर घोषणा करा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. त्यानंतर सरकारकडून वीजतोडणी तात्पुरती थांबवण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, आम्ही तुमचे अभिनंदन करतो. आपण घेतलेला निर्णय हा अधिवेशन संपल्यानंतरही कायम रहावा एवढीच इच्छा, असा टोला माजी अर्थमंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांना लगावला.

महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए! अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपने लावून धरलेल्या शेतकर्‍यांच्या वीजतोडणीसंदर्भात अखेर मविआ सरकारला नमावेच लागले. वीजतोडणी तत्काळ थांबवण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश. गोरगरीब शेतकर्‍यांसोबत भाजप सदैव खंबीरपणे उभा आहे.
-चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply