Breaking News

सुधागड, मुरूडमध्ये बच्चेकंपनीसह वृद्ध महिला व पुरुषही रंगात गेले न्हाऊन

पाली : प्रतिनिधी

कोरोनामुळे सलग दोन वर्षे कोणताही सण व उत्सव मनासारखा साजरा करता येत नव्हता. मात्र यंदा होळी व रंगपंचमीचा सण रंगाची उधळण करीत सर्वत्र उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पालीत ‘बुरा मत मानो होली है,‘ म्हणत बच्चेकंपनीसह वृद्ध महिला व पुरुष रंगात  न्हाऊन गेले होते.

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे, जिल्हा प्रशासनाने निर्बंधदेखील शिथिल केलेत.  त्यामुळे यावर्षी धुळवड सणाचा सार्‍यांनी मनमुराद आनंद लुटला. पालीसह सुधागड तालुक्यात होळी व धुळवड सण पारंपरिक पद्दतीने व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. गुरुवारी रात्री होळीची विधीवत पुजा करण्यात आली. या वेळी पारंपारीक वाद्य वाजवीत तर काही ठिकाणी होळीचे गाणे बोलत होळी भोवती प्रदक्षिणा घालण्यात आली.

होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी धुलिवंदन किंवा धूळवड खेळली जाते. सुधागडात धुळवड धुमधडाक्यात साजरा करण्यात आली.

मुरूड : प्रतिनिधी

शहर व ग्रामीण भागात गुरुवारी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांनी होळीसाठी लाकडे जमविली होती. सुपारीच्या झाडाचे विधिवत पूजन करून अनेक लोकांनी या वृक्षाला मिरवणुकीने होळीच्या जागेवर आणले आणि तेथे उभे केलेे. मध्यरात्रीच्या सुमारास त्याची यथसांग पुजा करून होळी करण्यात आली. ग्रामीण भागात ग्रामस्थांनी खालूबाजाच्या तालावर सुपारी झाडाला नाचवत व आकाशात भिरकावत मिरवणुका काढल्या होत्या. होळी हा कोळी समाजाचा आवडता सण असून यंदा या सणाचा उत्साह कोळी समाजामध्ये कायम दिसून आला. मुरूड शहरातील कोळीवाडा परिसरात होळी पेटवल्यावर तिच्या भोवती नृत्य करून कोळी बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नवीन कपडे व पारंपरिक वेशभूषेने कोळीवाडे सजले होते.

मुरूड शहरातील विविध भागातील होळीचे पुरोहिताच्या हस्ते विधिवत पूजा करून दहन करण्यात आले. शहरातील बाजरपेठ तरुण मित्रमंडळाच्या होळीच्या पूजेचा मान या वेळी डॉ. मयूर राज कल्याणी व भाविका कल्याणी यांना मिळाला. त्यांच्या हस्ते पूजा केल्यानंतर होळीचे दहन करण्यात आले. यावेळी अनेक लोक उपस्थित होते.

रोह्यात पर्यावरणपूरक होळी

रोहे : प्रतिनिधी

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोेहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख  वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयात नुकताच सामाजिक वनीकरण विभाग रोहा, महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय हरितसेना यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली.

राष्ट्रीय सेवा योजनेच रायगड जिल्हा समन्वयक प्रा. तुळशीदास मोकल यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी का करावी, याबाबत माहिती दिली. होळी हा सण महत्वाचा आहे, पण या सणाच्या आनंदासाठी आपण वृक्षतोड न करता पालापाचोळा वापरून पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे रोहा वनपाल दिलीप वाघे यांनी केले.

पर्यावरणपूरक होळीचा उपक्रम नेटाने यशस्वी करा, त्यात आपल्या बरोबर इतरांचाही सहभाग वाढवा व ही चळवळ व्यापक बनवा, असे प्रतिपादन प्राचार्य, डॉ. अतुल साळुंके यांनी या वेळी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनंत थोरात यांनी केले. वनरक्षक धिरेश विठोबा थळकर यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला. प्रा. सीमा भोसले यांनी आभार मानले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply