अनियमित पाणीपुरवठ्यामुळे अॅड. मनोज भुजबळ आक्रमक
पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेलमध्ये अनियमित कमी दाबाने व खंडित पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये सुधारणा न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी सिडकोला 25 एप्रिल रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ’मडका फोड’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नवीन पनवेलमध्ये दोन महिन्यांपासून अनियमित कमी दाबाने व खंडित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत सिडकोकडे विचारणा केली असता प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. याबाबत माहिती देताना अॅड. मनोज भुजबळ यांनी सांगितले की, पाईपलाईन लिकेज आहे, मोटर बिघडली आहे. टाटा कंपनीने पाणी सोडले नाही. लाईटची केबल तुटली आहे अशी कारणे सांगितली जातात. या सर्व समस्या सिडकोच्या असताना त्यासाठी रहिवाश्यांना वेठीस धरले जात आहे.
नवीन पनवेल मधील सेक्टर 12, 15 ए व 1 मधील ओव्हर हेड पाण्याच्या टाक्या सिडकोने पाडल्या आहेत. त्या नवीन बांधण्याचे आश्वासन देऊन ही अद्याप बांधल्या नाहीत. सिडकोने आपल्या मालकीचे मोर्बे धरण नवी मुंबई महापालिकेला देऊन पनवेलकरांच फसवणूक केली आहे. त्यातच सिडको नवीन पनवेलमध्ये भूखंडांचे टेंडर काढून बिल्डरांना मोठ्या किमतीला विकत आहे. या बांधकामांसाठी त्यांना व्यावसायिक दराने पाणीपुरवठा केला जातो, मात्र रहिवाशांना पाणी दिले जात नसल्याचे दिसून येत असल्याने यामध्ये 24 एप्रिल पर्यंत सुधारणा न झाल्यास सिडकोवर 25 एप्रिल रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेल मधील सर्व नगरसेवक व रहिवाशी धडक देऊन ’मडका फोड’ आंदोलन करतील, असा इशारा अॅड. मनोज भुजबळ दिला आहे.