Breaking News

मसूदची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानने त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत, तसेच त्याला प्रवासबंदीही लागू केली आहे. पाकिस्तानने मसूदवर शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याची खरेदी-विक्री करण्यावरही बंदी घातली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या इसिस आणि अल-कायदा निर्बंध समितीने बुधवारी संध्याकाळी मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केले. जैशने काश्मीरमधील पुलवामा येथे घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाच्या स्थितीपर्यंत तणाव निर्माण झाला होता. मसूदविरोधात निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश पाकिस्तान सरकारने अधिकार्‍यांना दिले आहेत. अमेरिका, यूके आणि फ्रान्सने मांडलेल्या प्रस्तावाला चीननेही पाठिंबा दिल्यानंतर अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला.

पुलवामा हल्ल्यानंतर काही दिवसांतच फ्रान्स, यूके आणि अमेरिकेने अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अल-कायदा निर्बंध समितीमध्ये प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील 15 देशांमध्ये व्हिटो अधिकार असलेल्या चीनने आपला विशेषाधिकार वापरून अझहरविरोधातील प्रस्ताव रोखला होता, पण अखेर आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमते घेत चीनला माघार घ्यावी लागली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply