अहमदाबाद : वृत्तसंस्था
भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा व अखेरचा सामना गुरुवार (दि. 4)पासून सुरू होणार आहे. भारताने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे हा सामना जिंकल्यास किंवा अनिर्णीत राखला तरी भारत मालिकेवर कब्जा करेल, तर इंग्लंडने सामना जिंकल्यास मालिका बरोबरीत सुटेल.
आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून अनुभवी उमेश यादव आणि युवा मोहम्मद सिराज यांच्यापैकी कोणाला भारतीय संघात संधी मिळणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्याचप्रमाणे मोटेराची खेळपट्टी या वेळी फलंदाजांसाठी नंदनवन ठरण्याची शक्यता असल्याने तिसरा फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवऐवजी पुन्हा एकदा वॉशिंग्टन सुंदरला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसर्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 10 गडी राखून धुव्वा उडवला. अवघ्या दोन दिवसांतच ही कसोटी संपल्यामुळे खेळपट्टीवर कडाडून टीका करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर चौथ्या कसोटीसाठी फलंदाजांनाही फायदेशीर ठरेल, अशी खेळपट्टी बनवण्यात येण्याची शक्यता आहे.
तिसर्या कसोटीत वेगवान गोलंदाजांना फारसा घाम गाळावा लागला नाही. त्यामुळे चौथ्या लढतीतसुद्धा भारत दोन वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. बुमराच्या अनुपस्थितीत इशांत शर्माच्या साथीने सिराजला प्राधान्य मिळू शकते. सिराजने गेल्या काही सामन्यांत दमदार कामगिरी केली असून, चेन्नईतील दुसर्या कसोटीतसुद्धा त्याने फिरकीपटूंसाठी पोषक खेळपट्टीवर बळी मिळवले होते. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या कसोटीत दुखापत झाल्यामुळे मायदेशी परतणारा अनुभवी उमेश आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असला तरी कोहलीची पसंती कोणाला मिळणार याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
मागील कसोटीत तिसर्या फिरकीपटूची भूमिका बजावणार्या सुंदरला अवघे एकच षटक गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. फलंदाजीत त्याला भोपळाही फोडता आला नाही, परंतु रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या रूपात दोन प्रमुख फिरकीपटू उपलब्ध असताना संघ व्यवस्थापन फलंदाजीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने सुंदरलाच पुन्हा खेळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुलदीपला संघाबाहेर बसावे लागेल.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …