महाड : प्रतिनिधी
एसटी कामगारांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी राज्यव्यापी बंद पुकारला आहे, या बंदला भाजपने पाठिंबा दिला असून, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी सोमवार (दि. 8) महाड एसटी आगारातील कर्मचार्यांची भेट घेऊन, तुमच्या मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाहीत, तोपर्यंत भाजप तुमच्या सोबत असेल, असा विश्वास दिला.
राज्य सरकारमध्ये विलिनीकरण, पगार वाढ आणि बोनस या प्रमुख मागण्यासाठी एसटी कर्मचार्यांनी सोमवारपासून राज्यभर बंद पुकारला आहे. या बंदमुळे प्रवाशांचे हाल होत असले तरी एसटी कामगारांच्या आत्महत्या आणि त्यांच्या रास्त मागण्या पाहता भाजपने त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. महाड आगारातील सर्व कामगार या बेमुदत काम बंद आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे या आगाराच्या सर्व फेर्या बंद झाल्या असून, संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे.
भाजपच्या पदाधिकार्यांनी सोमवारी महाड आगारात जावून आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचार्यांची भेट घेतली. या आंदोनात सहभागी होऊन एसटी कामगारांच्या मागण्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावरदेखील उतरु असे आश्वासन भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी या वेळी दिले. तसेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी कामगारांचा दुरध्वनीवर संपर्क करुन दिला. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, असे दरेकरांनी या वेळी सांगितले. भाजपचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे, अनिल मोरे, तालुका उपाध्यक्ष चंद्रजीत पालांडे, शहर चिटणीस राकेश वाघ, सोशल मीडिया सेल अध्यक्षा श्वेता ताडफळे, तुषार महाजन आदी या वेळी उपस्थित होते.