मुंबई : प्रतिनिधी
मुंबईने शेवटच्या साखळी सामन्यात कोलकात्यावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी 134 धावांचे आव्हान सहज पार केले. कर्णधार रोहित शर्माने 48 चेंडूत 55 धावांची खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 27 चेंडूंत 46 धावांची नाबाद खेळी साकारली. आता प्ले-ऑफमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जची लढत होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकावर स्थान मिळविण्यासाठी कोलकाताला ही लढत जिंकणे आवश्यक होते. कोलकाताने दिलेले 134 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या सलामीवीरांनी 6.1 षटकांत 46 धावांची भागिदारी रचली. प्रसिद्ध घोडाने डी कॉकला (30 धावा) बाद करत जोडी फोडली. त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माने डावाची सूत्रे हाती घेत कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत कोलकात्याच्या डावाला वेसण घातली. झंझावाती फलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्या आंद्रे रसेलला भोपळाही फोडता आला नाही आणि कोलकाता नाइट रायडर्सला अवघ्या 7 बाद 133 धावांपर्यंत मजल मारता आली. यंदाच्या हंगामात 13 डावांत 510 धावा करणारा रसेल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. सलामीवीर ख्रिस लिनच्या 41 धावा आणि शुभमन गिल (9) यांनी 49 धावांची भागीदारी केली, पण कोलकाताची मधली फळी कोसळली आणि त्यांचा डाव 133 धावांवर रोखला गेला. रॉबिन उथप्पा (40) आणि नितीश राणा (26) यांनी पाचव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. मुंबईच्या लसिथ मलिंगा (3-35), हार्दिक पंड्या (2-20), जसप्रीत बुमराह (2-31) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे कोलकाताच्या अपेक्षा भंगल्या. लिन आणि गिल यांनी संयमी सुरुवात केली. नंतर त्यांनी धावांची गती वाढविण्याचा प्रयत्न केला. लिनने मलिंगाला चौथ्या षटकात चौकार आणि षटकार लगावून 13 धावा वसूल केल्या. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये कोलकात्याला 49 धावांपर्यंत मजल मारता आली, पण हार्दिकने या दोन्ही सलामीवीरांना लागोपाठ बाद करत मुंबईला दिलासा दिला. त्यानंतर कोलकात्याच्या संघाला पाच षटकात केवळ 12 धावाच करता आल्या. 11 षटकांत त्यांची गाडी 2 बाद 61 अशी रडतखडत पोहोचली. उथप्पाने तर खेळलेल्या 47 चेंडूंपैकी 25 चेंडूंवर एकही धाव घेतली नाही. त्याचा फटका त्यांना बसला. त्यानंतर 13व्या षटकात मलिंगाने कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिक (3) आणि रसेल (0) असे मोठे धक्के दिल्यामुळे कोलकाताचे आव्हानात्मक लक्ष्य उभारण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.