Breaking News

भाजपच्या दणक्याने रूबी मिल्स कंपनी व्यवस्थापन नरमले

15 दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र

खोपोली, चौक : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील धामणी येथील रुबी मिल्स कारखान्यामधील कामगारांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फुटावी म्हणून भाजपप्रणित जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि.23)पासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनामुळे कंपनी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत 15 दिवसांच्या आत सकारात्मक चर्चा करून कामगारांच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन लेखी पत्राद्वारे दिले. त्यामुळे काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
या आंदोलनावेळी भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, भाजप खालापूर तालुकाध्यक्ष सनी यादव, राजेंद्र पालांडे, विठ्ठल मोरे, प्रसाद पाटील, रवींद्र पाटील, मनीष खवळे, उपाध्यक्ष विकास रसाळ, भरत महाडिक, रवी मोरे, जयेश पाटील, प्रसाद देशमुख, हरिभाऊ जाधव, विकास सावंत, निवृत्ती सालेकर, अविनाश सालेकर, मोहन घाडगे यांच्यासह कामगार, कार्यकर्ते उपस्थित होते.
रूबी मिल्स कारखान्यात गेल्या वीस वर्षाहून अधिक काळापासून काम करूनही 17 ते 18 हजार रुपये पगार मिळत असल्याने कामगारांनी पगारवाढीसाठी कंपनी व्यवस्थापनाकडे अनेक वेळा मागणी केली. त्याचप्रमाणे इतर काही मागण्या होत्या, मात्र याबाबत कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका न घेतल्याने अखेर जवळपास 100 कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनीच्या गेटसमोर सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले.
या आंदोलनात भाजपचे नेते तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित दाखवत कामगारांना पाठबळ दिले. त्यामुळे आंदोलन सुरू होताच अवघ्या दोन तासांच्या आत रूबी मिल्स कंपनी व्यवस्थापन नरमले. कामगारांच्या पगारवाढीबरोबरच अन्य मागण्यांवर येत्या 15 दिवसांमध्ये सकारात्मक चर्चा करू, असे पत्र आमदार प्रशांत ठाकूर यांना कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे काम बंद आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, रूबी मिल्स कारखान्यातील कामगारांच्या पगारवाढ व अन्य मागण्यांसाठी आज केलेले आंदोलन प्रतिकात्मक होते, पण कंपनी व्यवस्थापनाने येत्या काळात सकारात्मक भूमिका घेऊन कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर यापुढचे आंदोलन प्रतिकात्मक नसेल. कंपनी व्यवस्थापन आपल्याला हलक्यात घेत असेल, तर यांचा टांगा पलटी करायला आपण केव्हाही तयार आहोत तसेच युनियन व कामगारांना विश्वासात घेऊन कंपनीने जर काम केले पूर्ण ताकदीने त्यांना सोबत दिली पाहिजे हा माझासुद्धा आपणा सर्वांना आग्रह आहे. आज कंपनीच्या गेटवर बसण्याची वेळ आली आहे. दुर्दैवाने मॅनेजमेंटने ही वेळ पुन्हा आणली, तर गेटचे टाळे आम्ही लावू आणि आम्हीच उघडू तेव्हा ते उघडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Check Also

आपटा घेरावाडी येथे बोअरवेल आणि सोलर पंपाचे लोकार्पण

रसायनी : रामप्रहर वृत्तदुर्गम भागामध्ये सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य असून नागरिकांच्या समस्या …

Leave a Reply