Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीत अनेक नव्या चेहर्‍यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली असून यात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना चिटणीसपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली.
याशिवाय आमदार निरंजन डावखरे, आमदार गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी टाकली आहे. केशव उपाध्ये यांनाही कार्यकारिणीत बढती दिली गेली असून यापुढे मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी नवनाथ बन यांच्यावर टाकण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत प्रदेश कार्यकारणीतील नावांची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय नेतृत्वाने माझ्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतरच्या काळात निवडणूक आचारसंहिता आणि एकापाठोपाठ एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणी, पदाधिकारी नेमणुका या निवडणुकीनंतर कराव्यात असा निर्णय भाजपच्या राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांनी घेतला होता. काही महिने पदाधिकारी नेमणुकांबाबत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंवद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर मंडळींसोबत चर्चा केली, असे त्यांनी सांगितले.
या नियुक्तीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर व निरंजन डावखरे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले, तर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासमवेत खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेश बालदी आदी उपस्थित होते.
या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कौडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे, अर्चना पाटील चाकूरकर; सरचिटणीसपदी निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे; चिटणीसपदी प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय फुके, वर्षा ढहाळे, संतोष जनाटे, संजय जगताप, अर्चना डेहनकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी, भैरवी वाघ, कोषाध्यक्षपदी मिहीर कोटेचा, सहकोषाध्यक्ष अरुण लखानी, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, मुख्यालय सहप्रभारी विश्वास पाठक, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची नियुकी करण्यात आली आहे.
युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक, महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ, किसान मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वेताळ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर, एससी मोर्चा अध्यक्ष विश्वजित गायकवाड, एसटी मोर्चा अध्यक्ष देवराव होळी, भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष नरेंद्र पवार, तर अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपच्या कार्यपद्धतीत तीन वर्षात पदाच्या जबाबदार्‍या बदलत असतात. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता पूर्ण क्षमतेने काम करत असतो. कार्यपद्धतीप्रमाणे नवीन चेहर्‍यांसोबत अनुभवी चेहर्‍यांना संधी दिली आहे, असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रभावी योगदान
चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेले प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील महत्त्वाची मानली जाणार्‍या पनवेल महापालिकेत सलग दोन वेळा एकहाती सत्ता मिळवून देण्यात त्यांना यश आले तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही त्यांनी पक्षाचे वर्चस्व सिद्ध केले.
पनवेल महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये यापूर्वी कधीही सत्ता न मिळालेल्या भारतीय जनता पक्षाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कुशल आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे सत्ता प्राप्त झाली. याचबरोबर तळागाळापर्यंत भाजपची संघटना बळकट करत विकासाची दिशा सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे कामही त्यांनी प्रभावीपणे केले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळागाळापर्यंत पक्ष संघटना बळकट करण्यावर विशेष भर दिला. गावपातळीपासून शहरापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून विकासाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या क्षेत्रांत विकासाची गती वाढवण्यास त्यांनी प्राधान्य दिले. रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत पक्षाची भक्कम पायाभरणी करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

Check Also

जीएस महानगर बँकेच्या कामोठ्यातील स्थलांतरित शाखेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तजीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामोठे सेक्टर 21 येथील महाकाली निवास सोसायटीमध्ये स्थलांतरित …

Leave a Reply