पनवेल ः रामप्रहर वृत्त
संघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डी स्पर्धेतून अनुभवायला मिळाला. निमित्त होते गोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2026 स्पर्धेचे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ते 22 फेब्रुवारी अशा तीन दिवस खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 32 महिला आणि 128 पुरुष संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन घडवत प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक सामन्यांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून त्यांना पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हास्तरावर दर्जेदार खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने ही निवड चाचणी महत्त्वपूर्ण ठरली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी जनरल सेक्रेटरी अॅड. आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजकांनी केलेले उत्तम नियोजन, पंचांची काटेकोर कामगिरी आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठे यश लाभले.
कबड्डी हा ग्रामीण मातीतून उगम पावलेला खेळ असला तरी आज तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धांना विशेष महत्त्व असते. उलवे नोडमधील स्पर्धेच्या माध्यमातूनही गुणवंत खेळाडूंना पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरला. पुरुष व महिला या दोन्ही गटातील सामने रंगतदार झाले. चढाई करताना खेळाडूंची वेगवान हालचाल आणि बचावपटूंची एकजूट यामुळे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होत होता. अनेक सामन्यांमध्ये कडवी झुंज पहायला मिळाली.
स्पर्धेच्या आयोजनात खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये दर्जेदार क्रीडांगण, वैद्यकीय सुविधा, प्रेक्षक गॅलरी, भोजन, नाश्ता अशा सर्व आवश्यक व्यवस्थांचा समावेश होता. विशेष म्हणजे खेळाडू व त्यांचे सहकारी तसेच पंच, प्रेक्षक यांना रणरणत्या उन्हाची झळ लागू नये म्हणून क्रीडांगणावर छत टाकण्यात आले. उलवे परिसरात या निमित्ताने क्रीडामय वातावरण निर्माण झाले. कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांचा उत्साह वाढवत होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Check Also
अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील अवकाळी पाऊस, …
RamPrahar – The Panvel Daily Paper