जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे प्रतिपादन
अलिबाग : प्रतिनिधी
प्रत्येक गावात पाण्याचा स्त्रोत शोधून तेथे त्या गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉ. किरण पाटील यांनी दिली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अनेक विषयांवर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेला पिण्यास योग्य पाणी देण्याचा प्रयत्न आहे. गावातच पाण्याचा स्त्रोत शोधून त्यावर पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. ज्या विहिरी व तलाव गाळाने भरले आहेत, त्यातील गाळ उपसून विहिरी व तलावांची खोली वाढवून या जलस्त्रोतांवर त्या गावासाठी पाणीपुरवठा योजना राबवण्याचा, तसेच जी गावे अतिदुर्गम आहेत, तेथे झिंक टँक लावून पाणीपुरवठा करण्याचा मानस असल्याचे डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. कचर्याचे व्यवस्थापन करून जिल्ह्यात स्वच्छता राखणे तसेच मल निःसारणासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून जिल्हा सेफ्टीक टँकमुक्त करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे डॉ. पाटील यांनी सांगितले. रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा व इमारतींची माहिती घेतली जात आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा आहेत, त्यावर अतिक्रमण होऊ नये म्हणून संरक्षण भिंती बांधण्याचा आमचा विचार आहे. काही ठिकाणी इमारत जिल्हा परिषदेची असली तरी ती जागा जिल्हा परिषदेच्या नावावर नाही. त्यामुळे तेथे काम करताना अडचणी येतात. या जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. प्रशासक म्हणून बरेच काही करण्याची इच्छा असते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे मर्यादा येतात. रायगड जिल्हा परिषदेत सर्वच विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे योजना राबविण्यात अडचणी येतात. मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत काम करणे हे आव्हान आहे, अशी खंतही डॉ. किरण पाटील यांनी या वेळी व्यक्त केली.