नवी मुंबई : बातमीदार : शनिवारी प्रचार थंडावल्यावर निवडणूक यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे. अनेक दिवस मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या निवडणूक यंत्रणेसमोर आता निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान आहे. त्यानुसार 28 एप्रिल रोजी सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी व मतपेट्या पोहचल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्राजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
सोमवारी होणार्या मतदानासाठी ऐरोली व बेलापूर मधील 386 विधानसभा क्षेत्रात एकूण 838 बुथवर मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्येक बुथवर साधारण दीड हजार मतदारांचे नियोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी निश्चित मतदान केंद्राकडे पोलीस सुरक्षेत मतपेट्यांसह कर्मचारी व अधिकार्यांना पाठवण्यात आले आहे. शनिवारी रात्रीपासूनच सर्व मतदान केंद्रांच्या इमारतींभोवती पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान कर्मचार्यांना कोणत्याही आरोपाला सामोरे जावे लागू नये म्हणून त्यांच्या वाहनांमध्ये जीपीएस बसवण्यात आले आहे. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकार्यांच्या वापरासाठी असलेल्या कारसह कर्मचार्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या बसचाही समावेश आहे.
निवडणुकीसाठी लावण्यात येणारी शाई असे सर्व आवश्यक साहित्य पुरवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी कडक उन्हापासून मतदारांचे संरक्षण व्हावे म्हणून सावलीसाठी मंडप उभारण्यात आले आहेत, तर खुर्च्या व टेबलची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचार्यांना ओळखपत्र देण्यात आले असून ते घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना तडीपार करणे, अवैध शस्त्र जप्ती अशा कारवाया केल्या आहेत. गैरप्रकार होऊ नये यासाठी गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. मतदान केंद्राच्या आवारात 100 मीटरवर प्रवेशबंदी घातली जाणार आहे. त्या ठिकाणी केवळ निवडणूक अधिकारी व कर्मचारी, मतदार, उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी आणि पत्रकारांना प्रवेश दिला जाईल, मात्र त्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले ओळखपत्र घालणे बंधनकारक असणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper