खवय्यांची चंगळ : महागाईची फोडणी; 400 रु.किलोचा दर
पाली : प्रतिनिधी
पावसाळ्यात खाडीकिनारी चिवणी मासे मोठ्या प्रमाणात मिळू लागतात. यंदा पावसाच्या काही दिवस आधीच हे चविष्ट चिवणी मासे मिळत आहेत बाजारात विक्रीसाठी आले आहेत. त्यामुळे खवय्ये आनंदी झाले असून त्यांची चंगळ आहे. मात्र हंगामाची सुरुवात असल्याने चिवणी मासे महाग मिळत आहेत. तरीही खवय्ये हे मासे खरेदी करताना दिसत आहेत. या चिवणी माशांची आवक अलिबाग, पेण, उरण, पनवेल, पाली, रोहा आदी मासळी बाजारात काही प्रमाणात सुरू झाली आहे. मात्र आवक कमी असल्याने तब्बल 400 रुपये किलो आणि 300 ते 400 रुपयांना मध्यम आकाराचे 8 ते 10 मासे मिळत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत 20 ते 30 टक्क्यांनी भाव वाढले आहेत.
खाडीत सापडतात : खाडीच्या मुखाच्या भागात चिवण्या अधिक प्रमाणात सापडतात. मात्र खाडीकिनारे प्रदूषित झाल्याने चिवण्यांचे प्रमाण घटले आहे. तरीसुद्धा पावसाळ्यात चिवणी मासे मुबलक मिळतात. खाडीकिनारी हे मासे अंडी घालतात. पावसाच्या सुरुवातीला गाबोळी म्हणजेच पोटात अंडी असलेल्या चिवण्या अधिक सापडतात. या वेळी स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात चिवण्या पकडतात.
साफ करण्याची कला : चिवणी साफ करण्यासाठी चुलीतील राखाडी वापरतात. ती नसेल तर तांदळाचे पीठ वापरतात. डोक्याजवळील काटा हातात राखाडी घेऊन मोडावा लागतो. किंवा काहीजण तो सुरी किंवा विळीने कापून टाकतात.
वैशिष्ट्यपूर्ण रचना : चिवणीची त्वचा अतिशय चिकट व तेलकट असते. त्यामुळे तो हातात धरताना सटकतो. डोक्याजवळ टणक अणकुचीदार काटा असतो. त्यामुळे मासा सांभाळून पकडावा लागतो. त्याचा काटा टोचल्यास इजा होते.
हंगामातील पहिलेच चिवणी मासे असल्याने मागणी मागणी खूप आहे. खवय्ये खरेदीसाठी तुटून पडत आहेत. पाऊस सुरू झाल्यावर आवक वाढल्यानंतर चिवणी स्वस्त होतील. या माशांच्या अंड्यांना मोठी मागणी असते.
-गौरी मनोरे, मच्छी विक्रेत्या
चिवणी मासे खूप चविष्ट असतात. या मोसमात मिळणारे चिवणी मच्छी आवर्जून खातो. तळून किंवा कालवण करून हे मासे खाल्ले जातात.
-नीलेश पवार, खवय्ये- जांभूपाड़ा