सुधागड : प्रतिनिधी
वरुणराजाचे आगमन झाले असून तो सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अगोटीची खरेदी अंतिम जोरात आहे. यामध्ये सुक्या मासळीचीही बेगमी केली जात आहे. मागणी अधिक व आवक कमी असल्याने मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे भाव तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वधारले आहेत.
1 जूनपासून समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. परिणामी पावसाळ्यात मांसाहारी खाणार्यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय व आधार असतो. त्यामुळे या सुक्या मासळीचेही भाव वधारले आहेत. मागील महिन्यात 400 रुपये किलोने मिळणारी मोठी वाकटी आता तब्बल 700 रुपये किलोने मिळत आहे. सोडे, माकूल अशा सुक्या मासळीचे भाव तर खूप वाढले आहेत.
पाऊस कधीही सक्रिय होणार असल्याच्या शक्यतेने जिल्ह्यातील आठवडा बाजार व मासळी बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी रेलचेल सुरू आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत मासळीची आवक कमी होते आणि त्यांचे भावदेखील वधारतात. अशा वेळी घरात साठवून ठेवलेली सुकी मासळी काढली की मग जेवण चांगले जाते.
अलिकडे जिल्ह्यातील समुद्रात अगदी कमी प्रमाणात मासळी मिळत आहे. सापडलेली मासळी ताजी असताना विकण्यावर मच्छीमारांचा भर असतो. मासळी आधीच कमी मग सुकविण्यासाठी कशी उरणार, त्यामुळे मासळी फार कमी जण सुकवित आहेत, असे पालीतील मासळी विक्रेत्या गौरी मनोरे यांनी सांगितले.
इंधन व मजुरीच्या वाढलेल्या दरांमुळेदेखील सुक्या मासळीचे भाव वाढले आहेत. मासळीची आवक कमी झाल्याने सुकवलेले सुरमई व पापलेट, माकुल हे महागातले मासे तर बाजारातून गायब झाले आहेत.
मागील महिन्याच्या तुलनेत आता सुक्या मासळीचे भाव खूप वाढले आहेत. पावसाळा आल्याने खवय्ये अधिक प्रमाणात सुकी मासळी खरेदी करीत आहेत
-सरफराज पानसरे, विक्रेते, पालीपावसाळ्यात समुद्रातील मासळी मिळत नसल्याने सुक्या मासळीचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळे किंमत वाढली असली तरी सुकी मासळी काही प्रमाणात खरेदी केली आहे.
-किरण खंडागळे, नागरिक, पाली