टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

रोहे ः प्रतिनिधी
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला सुरूवात झाल्यानंतर रोहा तालुक्यात काही गावात पाणीटंचाई भासू लागली आहे. शहराजवळच असलेल्या धामणसई विभागातील मढाली खुर्द, वांदोली, वांदोली आदीवासीवाडी या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून तेथील महिलांना दोन कि.मी. अंतरावरून पाणी डोक्यावर आणावे लागत आहे. या तिन्ही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
धामणसई भागात पूर्वी उन्हाळ्यात कालवा चालू असायचा, त्यामुळे या भागातील विहिरींना पाणी असायचे. आता कालव्याला पाणी नसल्यामुळे या भागातील विहिरींही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. या गावात राष्ट्रीय पेय योजनेमार्फत पाणी पुरवठा होत होता. मात्र ही योजना ज्या विहीराच्या माध्यमातून चालत होती, त्या विहिरीचे पाणी कमी झाल्याने ही योजना निकामी ठरली आहे.
मढाली खुर्द, वांदोली व वांदोली आदिवासी या गावांना टँकर चालू करण्याची मागणी होत असताना यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. पूर्वी येथील ग्रामस्थ कुंडलिका नदीच्या पाण्याचा वापर करीत होते. मात्र एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी दुषित झाल्याने हे पाणी वापरा योग्य राहिले नसल्याने या विभागात उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. नदीचे पाणी औद्योगिक क्षेत्रामुळे दुषित होत असल्याने एमआयडीसीने या गावांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.