Breaking News

दुर्घटनाग्रस्त नागरिकांची वास्तव्यासाठी फरफट

नवी मुंबईत संक्रमण शिबिराचा अभाव

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

तुटलेल्या भिंती, तडे गेलेले स्लॅब, पायर्‍या चढताना हलणारा जिना, कधीही कोसळेल अशा स्थितीतील सिडकोनिर्मित इमारती असताना आता खासगी इमारतींनीही अवस्थाही तशीच झाली आहे. 1990 मध्ये बांधण्यात आलेली इमारती कुचकामी ठरल्यामुळे शहरातील नागरिकांवर भितीखाली वावरत आहेत. नवी मुंबईत संक्रमण शिबिरे नसल्यामुळे दुर्घटनाग्रस्त नागरिकांची वास्तव्यासाठी फरफट होताना दिसते.

नेरूळ सेक्टर 17 येथील जिमी पार्क सोसायटीतील एका इमारतीचे पाच मजल्यांवरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील तब्बल 22 कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. मध्यम उच्चभ्रू वर्गातील हे सर्व कुटुंब धोकादायक अवस्थेत घर असल्यामुळे आज उघड्यावर संसार करण्याच्या अवस्थेत आले आहेत. शनिवारी घडलेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने या इमारतीमधील कुटुंबांना सुरुवातीला महापालिकेच्या अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय इमारतीमध्ये हलवले होते, परंतु त्याठिकाणी राहण्याजोगे जागा नसल्यामुळे महापालिकेलाही रातोरात जागेची शोधाशोध करावी लागल्याने नवी मुंबई शहरातील संक्रमण शिबिराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात जर मुंबईच्या धर्तीवर संक्रमण शिबिर असती, तर आज या लोकांचे या शिबिरातील सदनिकांमध्ये तात्पुरती व्यवस्था महापालिकेला करता आली असती. वाशीतील जेएन- वन आणि जेएन – टू प्रकारातील सिडकोनिर्मित इमारतींची पडझड सुरू झाल्यानंतर आता याठिकाणी खासगी विकासकांमार्फत पुनर्विकासाचे काम सुरू झाले आहे. सर्वांत पहिले येथील रहिवाशांच्या वास्तव्यासाठी संक्रमण शिबिराची ओरड सुरू झाली, परंतु संक्रमण शिबिराकडे केवळ राहण्याचा एक पर्याय म्हणून बघितल्याने सत्ताधार्‍यांसहित प्रशासनानेही या मुद्द्याला महत्त्व दिले नाही.

शहरात केव्हाही पडतील अशा 20 पेक्षा जास्त अतिधोकादायक वर्गातील इमारती आहेत. या इमारतींसोबतच 1985 ते 90 च्या काळात झालेल्या खासगी विकासकांच्या इमारतीचे स्लॅबही आता कोसळायला लागले आहेत. नवी मुंबई आता जुनी होऊ लागली आहे. शहराला 30 वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. तसेच शहरात तयार केलेल्या इमारतीही आता जुन्या होत आहेत. अशा परिस्थितीत शहरात संक्रमण शिबिरांची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

जिमी पार्कमधील कुटुंबांचे स्थलांतर

जिमी पार्क सोसायटीतील स्लॅब कोसळलेल्या इमारतीमधील सुरुवातील 12 कुटुंबांची महापालिकेने बहुउद्देशीय इमारतीमध्ये व्यवस्था केली होती. परंतु राहण्याजोगे जागा नसल्यामुळे या कुटुंबांची आता वाशीतील राजस्थान आणि मध्यप्रदेश भवनात व्यवस्था केली आहे. या कुटुंबांत आणखीन काही कुटुंबीयांची भर पडली असून त्यांची संख्या 15पर्यंत पोचली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply