दुरुस्ती झाल्यानंतरच ताबा घेण्याची दरडग्रस्तांची भूमिका
पोलादपूर : प्रतिनिधी
अतिवृष्टी, महापूर आणि दरडग्रस्तांना देण्यात पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल येथील पुनर्वसन संकुलांची दुरवस्था सुरू आहे. या पुनर्वसन संकुलांमध्ये वास्तव्यासाठी जाण्यास दोन्ही गावांतील दरडग्रस्त उत्सुक नसल्याचे लॉटरीनंतर दिसून आले आहे.
पोलादपूर तालुक्यातील पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात बोरावळे येथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले. सावित्री महिला विकास संस्थेतर्फे पैठण गांवात तीन, देवपूर येथे चार, पार्ले येथे तीन, माटवण येथे पाच, पोलादपूर- जोगेश्वरी गाडीतळ येथे तीन, सडवली येथे सहा, लोहारमाळ येथे चार, रानबाजिरे येथे 23, आड येथे दोन, सवाद येथे एक आणि हावरे येथे सहा अशी एकूण 61 घरकुले बांधण्यात येऊन ताबाही देण्यात आला. पोलादपूर येथील चित्रे यांना घरबांधणीसाठी सरकारी अनुदान देण्यात आले. कोतवाल खुर्द आणि बुद्रुकच्या दरडग्रस्तांसाठी 28 घरकुले उभी राहतील एवढे क्षेत्र तर कोंढवी येथे 29 घरकुले उभी राहतील एवढे क्षेत्र उपलब्ध करून पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू झाले. मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टने खर्चाची जबाबदारी घेतली.
कोतवालमध्ये दरडग्रस्तांची संख्या 48 तर कोंढवी येथे 78 कुटूंबे अशी असताना दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 45 लाख रुपये खर्चातून केवळ 15-15 घरकुले उभारण्यात आली. तेथे जाणार्या रस्त्यासाठी भूसंपादन करण्यासाठी तत्कालीन तहसीलदारांनी केलेल्या कुचराईबद्दल जिल्हाधिकार्यांनी नाराजी उघड केली होती, मात्र त्यानंतरही कोंढवी आणि कोतवाल येथील घरकुलांच्या स्थितीमध्ये सुधारणा होण्याऐवजी ती दिवसेंदिवस खालावत गेली. येथे वीज, पाणी, रस्ते, शाळा या मूलभूत सुविधांबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ही घरकुले ओसाड राहून ढासळू लागली. ठेकेदारांकडून त्याकडे दुर्लक्ष होऊ लागले.
कोतवाल खुर्द येथे 10 डिसेंबर 2007 रोजी तांत्रिक मान्यता किंमत 49 लाख 21 हजार 434 रुपये असून दरसूचीमध्ये झालेल्या वाढीमुळे निविदेची किंमत 23.50 टक्के अधिक वाढल्यामुळे 10 लाख 64 हजार 81 रुपये खर्चातील अधिक वाढ होणार आहे. त्यानुसार कोतवाल खुर्द येथील एका घरकुलासाठी तीन लाख 45 हजार 790 रूपये 75 पैसे खर्च झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली.
कोंढवी येथे पुनर्वसन घरकुलाची किंमत 49 लाख 49 हजार 651 रुपये एवढी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 21 घरकुलांची प्रशासकीय मान्यतेनुसार मंजूरी असताना केवळ प्रत्येकी 15 घरकुले बांधण्यात आली आहेत. यातही कोंढवीतील घरकुले बांधण्यात आलेल्या जागेचा वाद उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने नजिकच्या काळात तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
लॉटरी लागलेल्या दरडग्रस्त ग्रामस्थांनी पुनर्वसन घरकुलांकडे पाठ फिरविली आहे. सर्वच घरकुलांचे काम पूर्ण होऊनही हस्तांतरीत न झाल्याने घरकुलांची कौले, खिडक्या, भिंती यांचे खूपच नुकसान झाल्याने कोंढवीप्रमाणे कोतवालच्या घरकुलांचीदेखील नव्याने डागडुजी करण्याची गरज निर्माण झाली आहे.