आणखी चार आमदार गुवाहाटीत दाखल
गुवाहाटी : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या आवाहनानंतरही शिवसेना आमदारांची बंडखोरी शमली नाही. आणखी चार आमदार गुरुवारी (दि. 23) सकाळी गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. यामध्ये शिवसेना आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर आणि रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांचा समावेश आहे. त्यामुळे शिंदे गटाकडे आता शिवसेनेचे 37 आणि नऊ अपक्ष असे एकूण 46 आमदारांचे बळ आहे.
शिवसेनेतून बंडखोरी केलेले नेते व मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार सध्या गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. शिंदे गटाला आमदारांचा वाढता पाठिंबा लाभताना दिसत आहे. बुधवारी शिवसेनेचे फायरब्रॅण्ड नेते तथा राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे आणखी एक आमदार योगेश कदम तसेच अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित गुवाहाटीत दाखल झाले, तर गुरुवारी सकाळी शिवसेनेचे मुंबईतील दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार सदा सरवणकर, कुर्ला नेहरूनगरचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल गुवाहाटीत पोहचले. आणखी काही आमदारही शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंसोबत असणारे आमदार
एकनाथ शिंदे (स्वतः), अनिल बाबर, शंभूराजे देसाई, महेश शिंदे, शहाजी पाटील, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, प्रकाश अबिटकर, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, किशोरअप्पा पाटील, सुहास कांदे, चिमणआबा पाटील, लता सोनावणे, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, योगेश कदम, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, अपक्ष आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल, राजेंद्र यड्रावकर, चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, गीता जैन.