पनवेल आगारात मराठी भाषा दिन
पनवेल : प्रतिनिधी
मराठी माणसाने आपसात मराठीत बोलण्याची लाज बाळगू नये, तर अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन पनवेलच्या वरिष्ठ आगारप्रमुख मोनिका वानखेडे यांनी बुधवारी (दि. 27 ) पनवेल येथे केले.एसटी महामंडळाच्या पनवेल आगारातील स्थानकाच्या आवारात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या वेळी वरिष्ठ आगारप्रमुख मोनिका वानखेडे, आगारप्रमुख विलास गावडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक ज्ञानेश्वर म्हात्रे, नामदेव वारघडे, विद्याधर मोकल, नंदकुमार भोसले, पत्रकार नितीन देशमुख, छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर, आगारातील कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ आगारप्रमुख मोनिका वानखेडे यांनी मराठीची लाज न वाटता मराठीतून बोलण्याला प्राधान्य देण्यास सांगून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नितीन देशमुख यांनी 1500 वर्षे वयोमान असलेल्या मराठी भाषेचे महत्त्व सांगून तिच्या बोलीभाषेतील गोडवा वर्णन करताना लिहिण्यातील साध्या चुकांतून कसे अर्थ बदलतात हे उदाहरण देऊन सांगितले. आगारप्रमुख विलास गावडे यांनीही मार्गदर्शन करून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ आगारप्रमुख वानखेडे यांनी प्रवाशांना गुलाब व पेढा देऊन स्वागत केले. या वेळी महिला कर्मचार्यांनी स्थानकात सुंदर रांगोळी काढली होती.