Breaking News

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते रामशेठ ठाकूर जनहितासाठी नेहमी पुढाकार घेतात आणि मुलांवर त्यांनी उत्तम संस्कार असल्याने आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी आहेत. आमदार म्हणून काम करीत असताना प्रशांत ठाकूर ठामपणे बोलतात आणि त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही. त्यामुळे ते सद्गुणी आमदार आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी (दि. 6) रात्री खारघर येथे नमो चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केले.
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत खारघर सेक्टर 14 येथील जय हनुमान चेरोबा बापदेव मैदानावर भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा दिवस-रात्र स्वरूपात खेळली जात आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आणि लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ना. नाईक बोलत होते.
उद्घाटन समारंभास व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, नमो चषकचे मुख्य आयोजक व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, माजी सभापती व स्पर्धा संयोजक प्रवीण पाटील, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, गुरूनाथ गायकर, निलेश बाविस्कर, संजय घरत, प्रवीण बेरा, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, किरण पाटील, अंबालाल पटेल, संतोष शर्मा, गौरव नाईक यांच्यासह स्पर्धा संयोजक भारतीय जनता पक्ष खारघर व प्रवीण स्पोर्टस वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, क्रीडा रसिक उपस्थित होते.
या वेळी मंत्री गणेश नाईक पुढे बोलताना म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आखून दिलेली चौकट आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर कधीही विसरले नाही. त्यामुळे दोन्ही सुपुत्र गुणी आहेत. पैसा डोक्यात येतो तेव्हा तो माणूस अधोगतीकडे जातो, परंतु रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोक्यात पैसा कधीच गेला नाही. त्यामुळे ते सर्व स्तरावर यशस्वी झाले आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असतात; त्याचप्रमाणे रामशेठ ठाकूर यांचे चांगले संस्कार असल्याने मुलेही संस्कारी आहेत.
आमदार प्रशांत ठाकूर नेहमी विधायक कार्य करत असतात त्यामुळे त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा असल्याचे ना. नाईक यांनी नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने हा नमो चषक आयोजित करून खेळाडूंना पर्वणी मिळाली आहे. विशेष म्हणजे भव्य आयोजन असतानाही नियोजनात कुठलाही भपका नाही, असे सांगत या स्पर्धेचे मंत्रीमहोदयांनी कौतुक केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून गावांना आवश्यक मैदानाचा विषय मांडला होता. त्याचा धागा पकडून मंत्री नाईक यांनी गावांकरिता आवश्यक असलेले भूखंड सिडकोकडून घेऊ. असे आश्वासित केले. सिडको व्यापार नाही तर विकास करणारी संस्था आहे त्यामुळे त्यांनी विकासावर भर द्यावा असे सांगत या वेळी त्यांनी मैदानांचा संदर्भ घेत सिडकोच्या अधिकार्‍यांवर ताशेरे ओढले. मी कधीही कुणाचा अवमान करत नाही, पण सिडकोमध्ये काही अधिकारी लायकी नसलेले आणि भ्रष्ट असल्याचा घणाघात त्यांनी केला.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेत नवी मुंबईचे शिल्पकार असल्याचे अधोरेखित केले. मैदान गावांची अस्मिता आहेत. त्यामुळे प्रत्येक गावाला किमान एक तरी मैदान असावे असा आग्रह आम्ही सिडकोकडे धरला आहे आणि त्यासाठी मंत्री गणेश नाईक यांचे पाठबळ मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्पर्धेविषयी बोलताना खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी सतत अशा स्पर्धाचे आयोजन केले जात असून खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी यापुढेही काम करत राहू, असे त्यांनी खेळाडूंना आश्वासित केले.
6 ते 9 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा होत असून या स्पर्धेतील विजेत्या संघाला एक लाख 11 हजार 111 रुपये, उपविजेत्यास 55 हजार 555 रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या संघास 33 हजार 333 रुपये तसेच मॅन ऑफ दि सिरीजला मोटरसायकल अशी भरघोस पारितोषिके असून दररोज प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये एक सायकलसुद्धा बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत कानपोली, दापोली, मुर्बी, पेठ, बामणडोंगरी, कुंडेवहाळ, कामोठे, ओवळे, बापदेव पोदी, भैरवनाथ विचुंबे, स्व. महादेव पेठाली, अथर्व इलेव्हन घोट, गावदेवी भाताणपाडा, हिमांशू वळवली, मंगलमूर्ती घरकुल, जय हनुमान नावडे, यंगस्टार वहाळ, जिवा इलेव्हन पेंधर, धाकटा खांदा, शनिकृपा कोपरा, शिवशक्ती खारघर, श्रीराम शिरढोण, उलवा आणि ओम साई भंगारपाडा या नामवंत खेळाडूंचा भरणा असलेल्या 24 संघांचा सहभाग आहे.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply