नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
पनवेल: रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समितीची सन 2024-25ची आमसभा शुक्रवारी (दि. ७) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहअध्यक्षतेखाली ही आमसभा झाली.
या आमसभेत नागरिकांच्या समस्या, तक्रारींना प्राधान्य देत संपर्क, उत्तर आणि योग्य कारवाही करण्याचे निर्देश संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालय, परिवहन, जनसुविधा, नदी प्रदूषण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.
या आमसभेला विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.