पनवेल : बातमीदार
खारघर येथील एका रूममध्ये लॅपटॉप व मोबाईल फोनचा वापर करून स्टार स्पोर्टस् या चॅनलवर चालू असलेल्या आयपीएलच्या 12 व्या मोसमातील चेन्नई सुपर किग्स व पंजाब ईलेव्हन या लाईव्ह क्रिकेट मॅचवर बेटिंग लावून जुगार खेळनार्या दोघांना मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 73 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खारघर येथील ओंकार अॅम्पायर बिल्डिंगमधील चौथ्या मजल्यावर चेन्नई सुपर किग्स व पंजाब ईलेव्हन या लाईव्ह क्रिकेट मॅचवर बेटिंग लावून जुगार खेळत असल्याची माहिती मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, सीबीडी बेलापूर यांना मिळाली होती. त्यानुसार वपोनि एन. कोल्हटकर यांनी पोलीस उपनिरीक्षक राणी काळे, पो.ना. प्रकाश साळुंखे, सागर हिवाळे व मिथुन भोसले असे पथक तयार केले. या इमारतीत छापा मारला असता रूममध्ये हर्ष गोवर्धनदास चुगनानी उर्फ बाबा (वय 33) व राजीव ओमप्रकाश बोहत (वय 34) हे इसम टीव्हीवर स्टार स्पोर्टस्-1 हिंदी या चॅनलवर चालू असलेल्या आयपीएलच्या 12 व्या मोसमातील चेन्नई सुपर किग्स व पंजाब इलेव्हन ही लाईव्ह क्रिकेट मॅच पाहून त्यांच्याजवळील लॅपटॉपचा वापर करून क्रिकेट बेटिंग हा जुगार खेळत व खेळवित असताना पोलिसांना आढळून आले. त्यांच्याकडून लॅपटॉप, हार्डडिस्क, मोबाईल, सिमकार्ड, रोख रक्कम, आयफोन जप्त करण्यात आला आहे. दोघांवर भादंवि कलम 465 सह मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(अ), 5 अन्वये खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.