पावसाळ्यात यंदाही वाहणार पाली पुलावरून पाणी
पाली : प्रतिनिधी
वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्गावर जांभूळपाडा, भालगूल व पाली येथील नदीवरील पुलांची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पालीतील अंबा नदी पुलावरून पाणी जाऊन वाहतूक खोळंबणार आहे. पावसाळ्यापूर्वी येथील पाली अंबा नदीवरील पुलाच्या एका मार्गिकेचे कामे पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन होते. मात्र हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अजूनही येथील जुन्या, अरुंद व कमी उंचीच्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. मुसळधार पाऊस आल्यास या पुलावरून पाणी जाते व दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबते. जांभुळपाडा येथील अंबा नदीवरील पुलांच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. सध्या या नवीन पुलावरून वाहतूक सुरू आहे. मात्र येथील जुना पूल पाडून त्या जागी नवा पुल उभारण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. भालगूल येथील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र नवीन पुलाला लागून असलेली जागा शेतकर्यांकडून देण्यात आलेली नाही. या जागेसंदर्भात वाद सुरू आहे. परिणामी नवीन पूल बांधूनही तेथून वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही.
वाकण-पाली-खोपोली या राज्यमहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम या महिन्या अखेरपर्यंत 100 टक्के पूर्ण होईल. फक्त पाली पुलाचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल. जांभूळपाडा पुलाची एक बाजू चालू करण्यात आली आहे. या राज्यमहामार्गावरील जुन्या पुलांचे स्ट्रॅक्टचरल ऑडिट करण्यात आले आहे. हे जुने पूल धोकादायक स्थितीत नसून प्रवासाकरिता योग्य आहेत.
-सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी
महत्वाचा मार्ग : वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्ग पुणे, मुंबई येथून खोपोलीमार्गे कोकणाकडे जाण्यासाठी वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय मानला जातो. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बेंगलोर व मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. त्याच बरोबर येथून विळेमार्गे पुणे आणि माणगावलाही जाता येते. त्यामुळे मुंबई, पुणे तसेच कोकणासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्गावरील जांभूळपाडा, भालगूल व पाली येथील पूल पूर्ण झाल्यास येथील वाहतूक सुरळीत होईल.
असे आहेत नवीन पूल -पाली, जांभूळपाडा व भालगुल या ठिकाणी तब्बल 25 कोटींच्या निधीतून अधिक क्षमता, रुंदी आणि उंचीचे पूल तयार होत आहेत. पाली येथील नवीन पुलांची रुंदी 16 मीटर आहे. तर लांबी 110 मीटर तसेच जांभूळपाडा पूलांची रुंदी 16 मीटर, लांबी 70 मीटर इतकी आहे. भालगूल पूलांची रुंदी 16 मीटर तर लांबी 55 मीटर आहे. हे तिन्ही पूल चार लेनचे होणार आहेत. त्यांची भार पेलण्याची क्षमता 75 टन आहे.