नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा
सिडको महामंडळाकडून मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या उभारणीकरिता महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाला देण्यात आलेल्या नवी मुंबईतील ऐरोली येथील भूखंडाचे मंगळवारी (दि. 13) मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत व सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या अधिकार्यांतर्फे हस्तांतरण करण्यात आले. या वेळी मराठी भाषा विभाग सहसचिव मिलिंद गवादे, सिडको सहव्यवस्थापकीय संचालक एस. एस. पाटील, अपर जिल्हाधिकारी तथा महाव्यवस्थापक (वसाहत) सिडको अनिल पवार, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, सहाय्यक भूमापन अधिकारी बी. डी. राठोड तसेच सिडकोचे अन्य अधिकारी उपस्थित होते. मराठी भाषा भवन उपकेंद्राची इमारत बहुद्देशीय सामायिक सुविधांनी युक्त असणार आहे. इमारतीत ग्रंथालय, बैठकांसाठी बहुद्देशीय सभागृहासह भाषाविषयक विविध उपक्रमांची कार्यालये व अध्यक्षांसाठी स्वतंत्र दालनांची व्यवस्था असेल, अशी माहिती मंत्री देसाई यांनी दिली. मराठी भाषा विकास व संवर्धनाकरिता कार्यरत असणार्या भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या संस्थांची कार्यालये मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणून एकसूत्रता निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने 2016मध्ये सिडकोकडे भूखंडाबाबत विचारणा केली होती. त्यानुसार सिडकोकडून ऐरोली येथील सेक्टर 13मधील भूखंड क्र. 6 अ हा अंदाजे 3000 चौमीचा भूखंड मराठी भाषा भवन उपकेंद्राकरिता निश्चित करण्यात येऊन दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने या भूखंडाचा ताबा राज्य शासनाला देण्यात आला. त्याचप्रमाणे इमारतीची उभारणी करण्याची जबाबदारी शासनातर्फे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास देण्यात आली आहे.