आगरी समाज विकास मंचाच्या वतीने निवेदन
पेण : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पेण तालुका तसेच रायगड जिल्ह्यातील नागरिकांना व शेतकर्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी आगरी समाज विकास मंचाच्या वतीने पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि माजी कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मंचाचे अध्यक्ष धर्माजी म्हात्रे, उपाध्यक्ष गोवर्धन पाटील, सल्लागार निवृत्त न्यायाधीश दामोदर म्हात्रे, सदस्य तु. जो. म्हात्रे, सचिव एन. आर. पाटील, किसन म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पेण तालुक्यात अतिवृष्टी व समुद्राला मोठी भरती येऊन खाडी किनार्यालगतच्या बांधबंदिस्तीला खांडी गेल्या व उधाणाचे तसेच पावसाचे पाणी गावांमध्ये घुसून येथील शेती, मत्स्यतळी, गणपती कारखानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरातील अन्नधान्य व इतर चीजवस्तूही खराब झाल्या आहेत. त्यामुळे पूरबाधितांना लवकरात लवकर मदत मिळावी, असे या निवेदनात म्हटले आहे.