वनविभागाच्या सर्तकतेने जखमी भेकराला मिळाले जीवदान
म्हसळा : प्रतिनिधी
शहरातील भरवस्तीमधील दुकानाच्या बंद शटरला संध्याकाळच्या सुमारास एका भेकराने जोरदार धडक जोरदार धडक दिल्याने ते जखमी झाले. त्याचे वृत्त समजताच म्हसळयाचे वनपाल तत्काळ घटनास्थळी पोहचले त्यांनी पशुधन पर्यवेक्षकांच्या माध्यमातून उपचार करून जखमी भेकराला जिवदान दिले. म्हसळा तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र फार मोठे आहे. या क्षेत्रात वन्य श्वापदांचा मुक्त संचार असतो. त्यामध्ये बिबट्यांच्या बरोबरीनेच रानडुक्कर, गवा, भेकर व अन्य प्राणी असतात. गावखेड्यांच्या परिसरांत ही श्वापदे मोठ्या प्रमाणात येतात. असेच एक वाट चुकलेले भेकर सायंकाळी 5.30 ते 6 वाजण्याच्या सुमारास म्हसळा बौद्धवाडी परिसरात आले. तेथील दुकानाच्या बंद शटरला धडक दिल्याने ते जखमी झाले. त्याला पाहण्यासाठी काही वेळातच नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. भेकर जातीचे श्वापद नागरीवस्तीत आल्याचे कळताच म्हसळ्याचे वनपाल संजय नाईकनवरे तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी परिक्षेत्र वनाधिकारी संजय पांढरकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन पर्यवेक्षक डॉ. बुलबुले यांच्या माध्यमातून उपचार करून जखमी भेकराला जिवदान दिले. त्यांना वनरक्षक भिमराव सुर्यतळ यांनी मदत केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper