पनवेल ः प्रतिनिधी
स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या स्वास्थ्यासाठी कार्य करणारे स्व. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आणि सहकार क्षेत्रातील कार्य अजरामर असून, त्यांचे विचार, शिकवण व आदर्श यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 7) उलवे नोड येथे केले. या वेळी आपल्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्व. जनार्दन भगत यांच्या गौरवास्पद कार्याचा उल्लेख केला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने कष्टकर्यांचे द्रष्टे नेते आणि थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पुण्यतिथी कार्यक्रम व त्यानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले. तत्पूर्वी भगतसाहेबांच्या शेलघर निवासस्थानीही अभिवादन करण्यात आले. या वेळी स्व. भगतसाहेबांना अभिवादन करताना ते बोलत होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख मान्यवर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, शकुंतला ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, पांडुशेठ घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, विकास घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव प्रा. नंदकुमार जाधव, कार्यकारी मंडळ सदस्य प्रकाश भगत, संजय भगत, वसंत पाटील, छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. ए. डोईफोडे, उद्योजक हरिचंद्र पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, हेमंत ठाकूर, अनंता ठाकूर, चिंतामणी घरत, विश्वनाथ कोळी यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक, विविध विद्यालये-महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षक उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्व. भगतसाहेबांचे कार्य तसेच आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, जनार्दन भगतसाहेबांच्या विचारांत मोठी शक्ती आहे. मन लावून काम करणारे भगतसाहेब हे आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. फक्त राजकारणच नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजात रूजवली असून, त्यांच्या नावाने व त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा विस्तार व कारभार वाढला आहे. आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांत गुणवत्ता वाढत आहे. त्या अनुषंगाने त्यांना अपेक्षित असलेले शिक्षण देण्याचे काम जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून यापुढेही केले जाईल, अशी ग्वाहीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली. जग झपाट्याने बदलत आहे. परिसरात येणार्या विविध प्रकल्पांमुळे लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे विकास होत असताना काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोचे अध्यक्ष म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर सोपवली असून, ते त्या अनुषंगाने काम करीत आहेत, असा उल्लेखही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केला.
सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्राचा वस्तुपाठ म्हणजेच भगतसाहेब होय. त्यांच्या नावाची अनोखी जादू आहे. त्यांच्या नावाने केलेले काम नेहमी यशस्वी होते. भगतसाहेबांचे विचार आदर्श होते. त्यामुळे त्यांच्या आदर्शातून शिकलेली मंडळी समाजात नावलैकिक मिळवत आहेत. भगतसाहेबांचे कर्तृत्व समाजाला दिशा देणारे आहे. समाजासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली. तंटामुक्ती ही संकल्पना अलीकडच्या काळात आली, पण प्रत्यक्षात भगतसाहेबांनी त्याकाळी तंटामुक्ती करीत विभागात सलोखा राखण्याचे काम केले असून, त्यांचे विचार आणि शिकवण सर्व समाजासाठी आदर्श आहे.
कामगार नेते महेंद्र घरत म्हणाले की, भगतसाहेब सतत गोरगरिबांसाठी लढले. शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार घेऊन भगतसाहेब कार्यरत राहिले आणि तेच विचार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आत्मसात करीत नेतृत्व केले. त्यांनी लोकांच्या सेवेसाठी शाळा, कॉलेज, मंदिरे स्वखर्चाने बांधली. ते जेव्हा खासदार झाले तेव्हा खर्या अर्थाने रायगड जिल्ह्याला विकास पाहायला मिळाल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख करतानाच 1984 सालच्या गौरवशाली लढ्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही या वेळी सांगितले. या विभागाचे नेतृत्व करीत असताना सिडकोकडून गावांना विकासनिधी मिळवून देण्याचे, तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काम केले. पहिल्यांदाच प्रकल्पग्रस्तांमधून सिडकोला अध्यक्ष देण्याचे काम फडणवीस सरकारने केल्याचा उल्लेख करून त्याप्रति आभार मानत आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्ष झाल्यापासून प्रकल्पग्रस्त गावांचा झपाट्याने विकास होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण सर्व भगतसाहेबांची लेकरे असून, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आम्हाला व्यासपीठ दिले, असा उल्लेखही घरत यांनी केला. कोपर येथे स्व. भगतसाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणीही त्यांनी भाषणातून केली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रास्ताविकातून स्व. जनार्दन भगत यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. भगतसाहेबांनी गव्हाणसह पनवेलला मार्गदर्शन करण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगून समाजात न्यायनिवाडा करण्याचे कामही त्यांनी प्रामाणिकपणे केले. समाजाला दिशा आणि शिक्षण देण्याचे स्व. भगतसाहेबांचे स्वप्न लोकनेते रामशेठ ठाकूर पूर्ण करीत असल्याचे नमूद करून भगतसाहेबांचा आदर्श घेऊन वाटचाल हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.