तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, हे नवीन तंत्रज्ञान आपण शिकायला हवं असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण सुभाष घईनेही असाच विचार करावा? होय सध्या सुभाष घई एआय तंत्रज्ञानाचा अभ्यास करताहेत.
सुभाष घईचे हे चित्रपट दिग्दर्शनातील पन्नासावे वर्ष. त्यांनी दिग्दर्शित केलेला एन. एन. सिप्पी दिग्दर्शित कालीचरण मुंबईत प्रदर्शित 6 फेब्रुवारी 1976. (मेन थिएटर जमुना). या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच सुभाष घईच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी सुरू आहे.
सुभाष घईना दिग्दर्शनाची ही संधी त्यांच्याकडे असलेल्या गोष्ट सांगण्याच्या त्यांच्या खुबी मुळे मिळाली. ते आणि बी. बी. भल्ला हे पटकथाकार. त्यात सुभाष घई निर्मात्यांना गोष्ट रंगवून खुलवून सांगत. एन. एन. सिप्पी यांनाही त्यांनी अशाच खास शैलीत गोष्ट ऐकवली. तेव्हा एन. एन. सिप्पी यांच्या लक्षात आले की ही गोष्ट ऐकत असताना जणू चित्रपट डोळ्यासमोर येतोय. एन. एन. सिप्पी यांनी सुभाष घईना काही दिवसांनी येऊन भेटा असे सांगितले. या भेटीत तीच गोष्ट अधिकच नाट्यमयरित्या सुभाष घई यांनी त्यांना सांगितले आणि म्हटले, तुमच्याकडे गोष्ट सांगण्याचे कसब आहे. तुम्हीच या चित्रपटाचं दिग्दर्शन का करत नाही? सुभाष घई यांना एकाच वेळी एक सुखद संधी आणि आव्हान होते. चित्रपट दिग्दर्शन म्हणजे काय हे माहित नसल्याने नेमका काय निर्णय घ्यावा हे सुभाष घईना समजेना, पण एक चांगली संधी आहे असा विचार करत त्यांनी एन. एन. सिप्पी यांना होकार दिला.आणि दिग्दर्शक म्हणून सुभाष घई यांच्या वाटचालीला सुरुवात झाली. सिप्पी यांची अपेक्षा होती राजेश खन्नाला घेऊन हा चित्रपट निर्माण व्हावा. सुभाष घईनी आपला मित्र शत्रुघ्न सिन्हाला घेऊन कालीचरण दिग्दर्शित करायचं ठरवले. कथा सुभाष घई आणि बी. बी. भल्ला यांची, पटकथा राम केळकर यांचे आणि संवाद जैनेन्द्र जैन यांचे. छायाचित्रणकार के. के. महाजन आणि संकलन वामन भोसले आणि गुरुदत्त शिराली यांचे.
शत्रुघ्न सिन्हाची दुहेरी भूमिका (वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रभाकर आणि कालीचरण), जोडीला रिना रॉय, प्रेमनाथ, अजित, मदन पुरी, डॅनी डेन्झोप्पा, अलका, विजू खोटे, डेव्हिड, दिनेश ठाकूर, कृष्ण धवन वगैरे वगैरे. चित्रपटाची गीते राजकवी इंद्रजीत सिंग तुलसी आणि रवींद्र जैन यांची तर संगीत कल्याणजी आनंदजी यांचे!
अतिशय नाट्यमय घडामोडी घडत घडत हा मसालेदार मनोरंजक चित्रपट खुलला. पब्लिकला आवडला. काही डायलॉग आणि गाणी लोकप्रिय झाली आणि पिक्चर सुपरहिट. या चित्रपटाची त्यानंतर कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या प्रत्येक भाषेमध्ये रिमेक झाली. हेदेखील यशच.
सुभाष घईच्या दिग्दर्शनातील पन्नाशीतील लक्षवेधक गोष्ट, त्यांच्या चित्रपटातील गीत संगीत नृत्याची बहारदार मेजवानी…
जा रे जा ओ हरजाई (कालीचरण), ओम शांती ओम, शांती शांती ओम, दर्दे दिल दर्द जिगर दिल मे बसाया आपने (कर्ज), तू मेरा हीरो है, मै तेरी दिलबर हू, प्यार करनेवाले कभी डरते नही (हीरो), ये जी ओ जी सुनलो मनमौजी, मै हू राम लखन (राम लखन), ये इलू इलू क्या है…., इमली का बूटा (सौदागर), चोली के पीछे क्या है… नायक नही खलनायक हू मै (खलनायक), किसी रोज तुमसे मुलाकात होगी, दो दिल मिल रहे है (परदेस), ताल से ताल मिला, दिल ये बेचैन वे (ताल) हे प्रत्येक गाणे पडदाभर दृश्य सौंदर्याचा छान प्रत्यय देते. नाच गाना हे तर आपल्या हिंदी चित्रपट संस्कृतीचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि पारंपरिक प्रेक्षकांना आवर्जून आवडणारी गोष्ट म्हणजे, रुपेरी पडद्यावरची गाणी हे सूत्र सुभाष घईला नेमके उमगले आणि त्याचा त्याने जणू पडदाभर सढळ हस्ते वापर केला आणि आपला स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण केला. त्याच्या यशात दूरदृष्टी, मेहनत, सातत्य आणि शोमनशीप या गुणांचे छान मिश्रण आहे.तसेच आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे, अडचणीत अडकून न पडता नवीन मार्ग काढत/शोधत पुढे जात राह्यचे.
सुभाष घई खरंतर अभिनय करण्यासाठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये चित्रपट माध्यमाचे प्रशिक्षण घेतल्यावर सुभाष घईने फिल्म फेअरच्या नवीन चेहरे स्पर्धेत भाग घेतला. त्याच स्पर्धेत राजेश खन्ना विजेता तर धीरजकुमार व सुभाष घई उपविजेते ठरले. सुभाष घईने राजश्री प्रॉडक्सन्सच्या ’तकदीर ’ (1967) या चित्रपटात भूमिका साकारत सुभाष घईने अभिनेता म्हणून वाटचाल सुरु केली. आणि मग अभिनेता म्हणून उमंग (1970), ग्रहण (1972), नाटक, गुमराह (1973) वगैरे काही चित्रपटात भूमिका साकारली. यापैकी ’ग्रहण ’ या चित्रपटात नूतन नायिका आहे, तर ’गुमराह’मध्ये रिना रॉय नायिका आहे. पण या चित्रपटांना अजिबात यश न मिळाल्याने सुभाष घईपुढे आव्हान निर्माण झाले. शक्ती सामंता दिग्दर्शित ’आराधना’ (1969) मध्ये सुभाष घईने राजेश खन्नाच्या पायलट मित्राची भूमिका साकारलीय.. सिनेमा खणखणीत यशस्वी ठरला पण सुभाष घईने सहनायकाच्या भूमिका स्वीकारण्यापेक्षा बी.बी. भल्ला याला जोडीला घेऊन पटकथा लेखक म्हणून करियरला वळण दिले. आणि खान दोस्त वगैरे चित्रपट लिहिले. अशा पध्दतीने बदल स्वीकारुन आपण बदलण्यास तयार आहोत हे दाखवून दिले आणि याच त्याच्या वृत्तीने त्याची वाटचाल घडवली असे दिसेल. आणि कालांतराने सुभाष घई ऐंशी- नव्वदच्या दशकातील शोमन म्हणून ओळखले गेले.
’कालीचरण ’पासून त्यांची दिग्दर्शक म्हणून वाटचाल सुरु झाली….. तरीदेखील सुभाष घई या नावाचा दबदबा निर्माण होण्यासाठी यशापयशाचा अनुभव घ्यावा लागला. शत्रूघ्न सिन्हाचा सेक्रेटरी पवनकुमार निर्मित ’विश्वनाथ’ (शत्रूघ्न सिन्हा, रिना रॉय, रणजित इत्यादी)ने जेमतेम यश मिळवले. पण ’गौतम गोविंदा’ ( शशी कपूर, शत्रूघ्न सिन्हा, मौशमी चटर्जी), रणजित विर्क निर्मित ’क्रोधी’ (धर्मेंद्र, शशी कपूर, झीनत अमान) या चित्रपटाच्या फ्लॉप्सने सुभाष घईच्या क्षमतेविषयी शंका व्यक्त होऊ लागली. चित्रपटाच्या जगात अपयश म्हणजे मागे पडणे होय, पण सुभाष घईकडे ’हुकमाचा एक्का’ होता. ’जॉनी मेरा नाम’ (दिग्दर्शक विजय आनंद), ’दीवार’ (दिग्दर्शक यश चोप्रा) या चित्रपटाचे निर्माते गुलशन रॉय यांचा त्रिमूर्ती फिल्मचा ’विधाता’ (1981)चे दिग्दर्शन सुभाष घईकडे होते आणि त्याने या चित्रपटासाठी दिलीपकुमार, शम्मी कपूर, संजीवकुमार असे तगडे स्टार एकत्र आणले. जोडीला अमरिश पुरी, संजय दत्त, पद्मिनी कोल्हापूरे होते. या चित्रपटात सुभाष घईला चांगलाच सूर सापडला, सिनेमा भरपेट मनोरंजन करणारा ठरला आणि चित्रपट सुपर हिट झाला. सात सहेलिया खडी खडी हे गाणे यातीलच! आणि पुनर्जन्माच्या सूडकथेवरचा सुभाष घईचा ’कर्ज’ (ऋषि कपूर, टीना मुनिम, सिमी गरेवाल, राज किरण) सुपर हिट झाला. या चित्रपटाचे निर्माता राकेश मल्होत्रा होता.
दिग्दर्शक म्हणून आता जम बसत असतानाच सुभाष घईने आता निर्माता म्हणून पाऊल टाकले . आपली मुक्ता आर्टस ही निर्मिती संस्था स्थापन केली. जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री या जोडीला घेऊन ’हीरो’ (1983) साकारला. जॅकी श्रॉफ मॉडेलिंगकडून सिनेमात आला होता, देव आनंदने त्याला ’स्वामी दादा’मध्ये अगदी छोटीसी व्हीलनची संधी दिली, तर मनोजकुमारच्या ’पेंटर बाबू’तून मीनाक्षी शेषाद्री सिनेमाच्या जगात आले. दोघांचेही पहिले चित्रपट फ्लॉप्स झाले, पण ’हीरो’ सुपर हिट झाला. या चित्रपटात शम्मी कपूर, संजीवकुमार, बिंदू अशी जबरदस्त सपोर्ट सिस्टीम होती.
’हीरो’च्या खणखणीत यशाने सुभाष घई या नावाचा दबदबा निर्माण झाला. त्यासह घईच्या चित्रपटाला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत असेही समिकरण बराच काळ घट्ट झाले. त्यानंतर घईने इतर निर्मात्यांसाठीचा ’मेरी जंग’ (नूतन, अनिल कपूर, मीनाक्षी शेषाद्री) हा एकमेव चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट निर्माते एन. एन. सिप्पी यांचा होता. या चित्रपटाचा वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओतील मुहूर्त मला आजही आठवतोय. अनिल कपूरने दणक्यात संवाद म्हटला होता. या चित्रपटाचे लेखन जावेद अख्तरचे आहे. अन्यथा सुभाष घईने बराच काळ राम केळकर यांच्या पटकथेवर चित्रपट दिग्दर्शित केले. सुभाष घई म्हणजे हमखास ज्युबिली हिट असे जबरदस्त समीकरण मग ’कर्मा’ (दिलीपकुमार, नूतन, नसिरुद्दीन शहा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, श्रीदेवी, पूनम धिल्लॉन, अनुपम खेर. याही चित्रपटाचा ऐन दिवाळीच्या दिवशी मेहबूब स्टुडिओत रंगलेला भव्य मुहूर्त आजही आठवतोय. आपल्या चित्रपटाच्या मुहूर्तावरही आपला प्रभाव असावा असाच सुभाष घईचा बाणा दिसला), राम लखन (राखी, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, डिंपल कपाडिया, अमरिश पुरी, अनुपम खेर), सौदागर (दिलीपकुमार, राजकुमार, जॅकी श्रॉफ, तसेच तेव्हा नवीन चेहरे विवेक मुशरन आणि मनिषा कोईराला), खलनायक
(राखी, संजय दत्त, माधुरी दीक्षित, अमरिश पुरी)… सुभाष घईचा हा 1993 पर्यंतचा सतत उंचावलेला आलेख. प्रत्येक चित्रपट ज्युबिली हिट. सुभाष घईने प्रेक्षकांची नाडी बरोबर ओळखली असे म्हटले गेले. आणि या प्रवासात आपल्या प्रत्येक चित्रपटात सुभाष घईने छोटीशी का होईना पण एखाद्या गाण्यात भूमिका साकारलीय. आपण मूळचे अभिनेते आहोत याचा त्याने विसर पडू
दिला नाही.
अशातच सुभाष घईने मुकुल आनंदकडे दिग्दर्शन सोपवून ऐन दिवाळीच्या दिवशी जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ’त्रिमूर्ती’ या चित्रपटाचा अतिशय थाटात मुहूर्त केला. संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि शाहरूख खान अशी जबरदस्त स्टार कास्ट असल्याने हा मुहूर्त प्रचंड गाजत असतानाच संजय दत्तला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात पुन्हा एकदा अटक करण्यात आली आणि या चित्रपटात त्याच्या जागी अनिल कपूर आला. हा चित्रपट निर्मितीवस्थेत फारच रखडला आणि एकदाचा प्रदर्शित झाल्यावर फ्लॉप झाला. याच फ्लॉपनंतर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल हे मुक्ता आर्टसबाहेर पडले. हे अपयश सुभाष घईचे मानले गेले. त्यानंतर सुभाष घईच्या ’परदेस’ (शाहरूख खान आणि महिमा चौधरी)ला चांगले तर ’ताल’ (अनिल कपूर, ऐश्वर्या रॉय, अक्षय खन्ना, संगीत ए. आर. रेहमान)ने बरे यश मिळवले. पण ’यादे (जॅकी श्रॉफ, ह्रतिक रोशन, करिना कपूर) सुपर फ्लॉप झाला आणि सुभाष घईची घसरण सुरु झाली. आता त्याच्या ’जुन्या चित्रपटाच्या आठवणी’ काढल्या जाऊ लागल्या. त्यानंतर सुभाष घईने युवराज (सलमान खान, कैतरिना कैफ), किसना (विवेक ओबेरॉय, इशा श्रावणी, अमरिश पुरी), ब्लॅक अॅण्ड व्हाईट (अनिल कपूर) या चित्रपटांचे दिग्दर्शन केले, पण त्यात तो सुभाष घई टच नव्हता. एव्हाना हिंदी चित्रपटही खूपच बदलला होता. त्याची सुरुवात आदित्य चोप्रा दिग्दर्शित ’दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’
(1995) ने झाली होती आणि त्या बदलाशी दिग्दर्शक म्हणून सुभाष घईला जुळवून घेता आले नाही, पण तोपर्यंत त्याच्या मुक्ता आर्टस या बॅनरचा जम बसला होता. ओशिवरा भागात भारी मोठे ऑफिस थाटले होते. निर्माता म्हणून सुभाष घईची खेळी सुरु राहिली. नागेश कुकूनर दिग्दर्शित ’इक्बाल’ (2006)ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला हा मुक्ता आर्टसचा गौरव झाला. श्रेयस तळपदेचे हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले पाऊल यशस्वी ठरले. त्यानंतर सुभाष घईच्या मुक्ता आर्टसने राहुल, ऐतराज, 36 चायना टाऊन, अपना सपना मनी मनी, जॉगर्स पार्क, एक और एक ग्यारह वगैरे हिंदी तसेच सनई चौघडे, संहिता या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.त्यांनी ’विजेता’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.
सुभाष घईच्या दिग्दर्शनातील तीन चित्रपटात (विधाता, कर्मा आणि सौदागर) दिलीपकुमारने भूमिका साकारलीय, पण अमिताभ बच्चनचे काय? सुभाष घईने बीग बीला वेगळ्या गेटअप आणि पोशाखातील भूमिका देत ’देवा’ (1989) या चित्रपटाचा भव्य ग्लॅमरस मुहूर्त केला. या चित्रपटाला राहुल देव बर्मनचे संगीत होते. गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओतील या चित्रपटाच्या सेटवर आम्हा मिडियाला अजिबात प्रवेश नव्हता. त्यामुळे तर या चित्रपटात नेमके काय बरे असेल याची उत्सुकता वाढली, पण ते पहिले चित्रीकरण सत्र संपले आणि हा चित्रपटच डब्यात गेला तो कायमचा! आणि सुभाष घईच्या दिग्दर्शनातील चित्रपटात बीग बी हा योग दुर्दैवाने साध्य होऊ शकला नाही आणि राहुल देव बर्मनचे घईच्या चित्रपटाला संगीत हेदेखील घडायचे राहिले.
सुभाष घईने आपल्या करियरचा खूप चांगला विस्तारवाद केला. त्याने गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये चित्रपट माध्यमाच्या अभ्यासक्रमाची प्रचंड मोठी अशी व्हीसलिंग वूड ही संस्था स्थापन केली. तेथे भव्य मिनी थिएटरपासून या माध्यमासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान आहे. सुभाष घईचे हे नवीन पिढीला खूपच मोठे देणे आहे.
सुभाष घईचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मिडिया फ्रेन्डली असणे. आपल्या नवीन चित्रपटाच्या मुहूर्तापासून प्रीमियरपर्यंत मिडियाला आवर्जून बोलावणार. अनेकदा तरी आउटडोअर्स शूटिंगसाठी नेणार. भरपूर गप्पा करणार. फार पूर्वी सुभाष घईच्या स्वतंत्र मुलाखतीचेही योग आले असता असे जाणवले की, हा माणूस प्रचंड गप्पिष्ट आहे. खूप किस्से आणि आठवणीने गप्पा रंगवणार.
सुभाष घईच्या दोन गोष्टी सांगायला हव्या. त्याच्याकडूनच पूर्वी त्या समजल्या. ’कर्ज’ या चित्रपटातील दर्दे दिल दर्द जिगर… या गाण्याचे पहिल्या दिवसाचे शूटिंग संपल्यावर ऋषि कपूरने सुभाष घईला सांगितले, इतर गाण्यांप्रमाणेच या गाण्यालाही नृत्य दिग्दर्शक हवाय. सुभाष घई शांतपणे म्हणाला, मी हे गाणे पूर्णपणे चित्रीत करतो, त्यानंतर आपण रश प्रिन्ट पाहून ठरवू काय करायचे ते. त्यानुसार जेव्हा हे गाणे एडिट झाल्यावर ऋषि कपूरने पाहिले तेव्हा त्याने सुभाष घईला प्रचंड दाद दिली….. सुभाष घई आवश्यक तेथेच नृत्य दिग्दर्शकाला संधी देई, इतकी त्याची गीत संगीत नृत्य सादरीकरणावर पकड. तर ’खलनायक’ची मूळ गोष्ट खूप वेगळी होती. कलात्मक चित्रपटाच्या पठडीतील चित्रपट बनवायचा म्हणून त्यानी नाना पाटेकरला साईन करायचे ठरवले. नाना पाटेकरसोबत तीन मिटींग झाल्यावर सुभाष घईच्या लक्षात आले की, बहुदा आपण सेटबाहेर बसणार आणि नाना सर्व चित्रपटच हाती घेणार. सुभाष घईने नाना पाटेकरचा नाद सोडला आणि पटकथेत फेरफार करून महामनोरंजक चित्रपट निर्माण करायचे ठरवून संजय दत्तला साईन केले…
सुभाष घई सतत काही ना काही उलाढाल करणारा सिनेमावाला. म्हणून तर स्वतःची ओळख आणि स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरलाय.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper