Breaking News

बनावट कागदपत्रांद्वारे बँकांना लाखोंचा गंडा; आरोपींना अटक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून गृहकर्ज घेऊन विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे.

या टोळीने मुंबईसह नवी मुंबईत केलेले नऊ गुन्हे उघडकीस आले असून या टोळीने अशाच प्रकारे इतर बँकामध्ये बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून कर्ज घेऊन अनेक बँका व फायनान्स कंपन्याची फसवणूक केली असण्याची शक्यता असून त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलिस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यामध्ये श्रीधर नरोला (वय 43), सत्येन यशवंत पडवळ उर्फ संजय सुनील सावंत (वय 45), हितेश वेद उर्फ संजय सुनिल सावंत (वय 50), पवन सिन्हा उर्फ अजय शेट्टी (वय 45) या चार आरोपींचा समावेश आहे. या टोळीने 2018मध्ये बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून तोतया व्यक्ती उभ्या करून बजाज फायनान्स कंपनीकडून 52 लाख रुपयांचे गृहकर्ज घेऊन फसवणूक केली होती.

या प्रकरणात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वाशी पोलिसांच्या पथकाने या टोळीचा शोध सुरू केला होता. या टोळीने कर्जाची रक्कम वटविण्याकरिता मूळ व्यक्तीच्या नावाने उघडलेल्या बनावट खात्याची माहिती बँकांना दिल्याचे तपासात आढळून आले. उपलब्ध कागदपत्रे व तांत्रिक तपासावरून पोलीस यातील मुख्य आरोपीपर्यंत पोहचले. त्यानंतर पोलिसांनी श्रीधर नरोला या मुख्य आरोपीला मिरा रोड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर इतर आरोपींनाही अटक केली.

या टोळीत सहभागी असलेल्या महिलेचा शोध सुरू असून या टोळीने मुंबई, नवी मुंबई परिसरातील विविध बँकांमध्ये बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून कर्ज घेऊन अनेक बँकांची फसवणूक केली असण्याची शक्यता व्यक्त आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी श्रीधर नरोला हा या टोळीचा सूत्रधार असून तो उच्चशिक्षित आहे. श्रीधर संगणक तज्ज्ञ असून या ज्ञानाचा वापर करून त्याने बनावट कागदपत्रे तयार केल्याचे तपासात आढळून आले आहे. आरोपींनी बनावट व्यक्तींच्या नावाने ओळखपत्र व रहिवाशी पुराव्याची कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपनीकडून विविध शोरूममधून गृहोपयोगी वस्तू, एसी, टीव्ही तसेच मोटरसायकल यासारख्या वस्तू कर्ज घेऊन विकत घेत असल्याचे व त्यानंतर त्या विक्री करून हा गुन्हा करण्यासाठी पैसे उभे केल्याचे तपासात आढळून आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply