महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील विन्हेरे परिसरात कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मेळाव्याच्या माध्यामतून शेतकर्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले जात आहे. नुकतेच राजिवली गावात कृषी तंत्रज्ञान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाड तालुक्यात आतापर्यंत 134 ग्रामपंचायतीमध्ये कृषी संजीवनी मेळावे आयोजित केले गेले आहेत. कृषी संजीवनी मेळाव्यांतून महाड तालुक्यातील शेतकर्यांना भात बियाणे, बियाणे निवड, आणि लागवड, यांत्रिक सांधणे आदीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. या मेळाव्यांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे. राजिवली येथे भातपिक शेतीशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमात कृषी पर्यवेक्षक टी. पी. जगदाळे यांनी रोपवाटिका व्यवस्थापन, शेतकर्यांना येणार्या समस्या, खत व्यवस्थापन, भात लागवडीच्या विविध पद्धती, नाचणी लागवड तंत्रज्ञान व नाचणी प्रक्रिया उद्योग, भाजीपाला उत्पादन वाढ, कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवडीसंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक यु. एस. लेंगरे यांनी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, 10 टक्के खत बचत मोहीम या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. राजिवली सरपंच विकास जगदाळे यांच्यासह शेतकरी या भातपिक शेतीशाळेस बहुसंख्येने सहभागी झाले होते.