Breaking News

फेसबुकवरील मैत्री पडली महागात

मुंबई ः प्रतिनिधी :  अंधेरीत एका 60 वर्षीय महिलेला आक्षेपार्ह फोटोच्या सहाय्याने ब्लॅकमेल करून 12 लाखांना गंडा घालण्यात आला आहे. ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरून फिर्यादी असलेल्या वृद्ध महिलेची एका तरुणाशी ओळख झाली होती. या प्रकरणी दुबईत राहणार्‍या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधेरी परिसरात राहणार्‍या या महिलेची जानेवारी महिन्यात 40 वर्षीय एका व्यक्तीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्या वेळी आरोपीने आपण दुबईतील बँकेत लेखापाल असल्याचं महिलेला सांगितलं. या ओळखीतून महिलेने तिच्या मुलाला दुबईत नोकरीला लावण्याची विनंती आरोपीला केली. आरोपीनेही महिलेला मुलाला नोकरीला लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोघांमध्ये ऑनलाईन चॅटिंग सुरू झालं. त्यानंतर अज्ञात व्यक्तीनं महिलेला एका अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आक्षेपार्ह फोटो पाठवण्यास सांगितले.सुरुवातीला महिलेने नकार दिला. मात्र, कालांतराने विश्वासापोटी तिने आरोपीला आक्षेपार्ह फोटो पाठवले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आरोपी व्यक्ती महिलेला भेटण्यासाठी आली. त्याने मुलाला नोकरीला लावण्यासाठी पाच लाख रुपयांचा चेक महिलेकडून घेतला. त्यानंतर आरोपीच्या पत्नीने दूरध्वनी करून महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर पीडित महिलेचे फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देत 12 लाख उकळले. त्यानंतरही आरोपीच्या पत्नीने पैशांची मागणी सुरूच ठेवली. मानसिक दबावाखाली आलेल्या पत्नीने सर्व प्रकार तिच्या बहिणीला सांगितला. त्यानंतर पीडित महिलेने या प्रकरणी अंधेरी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी खंडणी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कथित दुबईत राहणार्‍या दाम्पत्याच्या शोध घेत आहेत. आरोपी पती-पत्नी खरंच दुबईत राहतात का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply