पेणमध्ये दोन जण गेले वाहून, जनजीवन विस्कळीत
पेण : प्रतिनिधी
तालुक्यात सतत मुसळधार पाऊस पडत असून, नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यात तालुक्यातील दोन व्यक्ती वाहून गेल्या. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पेण तालुक्यातील मुंगोशी येथील लक्ष्मण काशिनाथ चौरे (वय 42) हे सोमवारी मासेमारी करण्यासाठी गेले असता पावसाच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह उरण येथे सापडला. बेलवडे येथील दौलत माया पवार (वय 60) हे मंगळवारी मासेमारी करण्यासाठी गेले असता तेदेखील पावसाच्या पाण्यात वाहून गेले. मात्र त्यांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पेण तालुक्यातील महलमिरा डोंगर (चांदेपट्टी) येथील 26 कुटुंबांतील 56जणांना आंबेघर येथील मराठा समाज हॉलमध्ये हलविण्यात आले आहे. तर कांदळेपाडा गावामध्ये पुराचे पाणी घुसून सुमारे 40 घरांचे नुकसान झाले आहे. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आणि तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी कांदळेपाडा गावातील पूरसदृश परिस्थितीचा पाहाणी करून आढावा घेतला. येथील ग्रामस्थांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच मुरलीधर भोईर यांनी या वेळी प्रांताधिकार्यांकडे केली. दरम्यान, गुरुवारी (दि. 7) एसटी बसने धडक दिल्यामुळे पेण बस स्थानकासमोरील तीन विद्युत खांबांचे नुकसान झाले. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून विजेचे खांब नव्याने उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे महावितरणचे अभियंता धनंजय पाटील व नंदकुमार जाधव यांनी सांगितले. दिवसभरात पेण तालुक्यातील रोडे, करंबेली आणि वरसई फाटा येथील प्रत्येकी तीन गोठ्यांचे नुकसान झाले आहे. शहरातील एसटी स्थानक, विक्रम स्टँड परिसर, उत्कर्षनगर, म्हाडा कॉलनी आदींसह सखल भागात पाणी साचले होते.
तिसर्या दिवशीही जोर कायम, नगर परिषदेचा सतर्कतेचा इशारा
रोहे : तालुक्यात सलग तिसर्या दिवशीही मुसळधार पाऊस कायम आहे. गुरुवारी (दि. 7) रोहा तालुक्यात सकाळपासूनच पावसाचा जोर दिसून आला. त्यामुळे कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. या नदीवरील जुना रोहा अष्टमी पुल तिसर्या दिवशीही वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत असल्याने रोहा अष्टमी जुना पुल बुधवारी वाहतुकीस बंद करण्यात आला होता. तेंव्हापासून नव्या मोठ्या पुलावरुन वाहतूक सुरू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगर परिषद कर्मचारी, पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने नगर परिषदेच्या वतीने रोहा व अष्टमी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.