कर्जत : बातमीदार
शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे धुमसान सुरू आहे. शहरातील भगवान टॉकीज भागात पावसाचे तुंबलेले पाणी तीन घरांत घुसले. त्यामुळे घरातील सामानाचे नुकसान झाले. मात्र कर्जत नगरपालिकेने तात्काळ पावले उचलत साचून राहिलेले पाणी जाण्यासाठी मार्ग काढला आणि नागरिकांनी दिलासा दिला.
कर्जत शहरात मागील तीन दिवस पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे उल्हास नदी काठोकाठ भरून वाहत आहे. या नदीजवळ असलेल्या आमराई भागातील भगवान टॉकीज परिसरात नवीन इमारती बांधल्या जात आहेत. त्यासाठी आणलेले बांधकाम साहित्य तेथेच पडलेले असल्याने तेथील पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाला आहे.
परिणामी पावसाचे पाणी तुंबून ते तेथील तीन घरांमध्ये घुसले. ही माहिती समजताच नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, माजी नगरसेवक प्रवीण गांगल, आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे, अतिक्रमण विरोधी विभागाचे लक्ष्मण माने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बांधकाम व्यवसायीक जितेंद्र ओसवाल यांना बोलावून घेतले. त्यानंतर ओसवाल यांनी तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने मार्ग काढला.