Tuesday , February 7 2023

सुपारी संघाकडून मिळतोय अनेकांना रोजगार

कोकणाला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. उंच उंच नारळ-सुपारीची झाडे आणि निळाशार समुद्रकिनारा. या सृष्टीसौंदर्यामुळे वर्षाला लाखो पर्यटक कोकणच्या सागरीकिनार्‍याला भेट देत असतात. सुपारीची उंच झाडेसुद्धा पर्यटकांना आकर्षित करीत असतात. श्रीवर्धन व मुरूडसारख्या भागात रोठा नावाची नावाजलेल्या सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. या सुपारीला जगभरातून मोठी मागणी आहेे. वर्षाला एकदाच येणारे हे पीक बागायतदारांचे आधार असून, सुपारीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी बागायतदार मोठे कष्ट घेतात.

मुरूड तालुक्यात सुपारी लागवडीचे क्षेत्र 450 हेक्टर असले तरी प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्र 399 हेक्टर आहे. मुरूडसह आगरदांडा, शिघ्रे, नांदगाव, चिकणी, भोईघर, काकळघर, मांडला, बोर्ली, मजगाव, काशीद, माझेरी आदी परिसरात सुपारी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 3 जून 2020 रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात सुपारीची असंख्य झाडे जमीनदोस्त झाली, तर अनेक झाडे मोडून पडली. या नैसर्गिक संकटात मुरूड तालुक्यातील सुमारे 142 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने सुपारीचे उत्पन्न 50 टक्क्यांनी घटले. या परिस्थितीला धीराने तोंड देत येथील बागायतदार मोठ्या कष्टाने सुपारीचे पीक घेत आहेत. आपल्या बागायतीमध्ये त्यांनी सुपारीच्या नवीन वृक्षांची लागवड केली आहे.

मुरूड, श्रीवर्धन परिसरात सुपारीचे फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, मात्र खाजगी व्यापार्‍यांकडून कमी भावात सुपारी खरेदी करणे, वजनात फसवणूक करणे यामुळे बागायतदारांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. या बागायतदारांनी संघटित होऊन 17 सप्टेबर 1938 रोजी सहकार तत्त्वावर मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाची स्थापना केली. मुरूड तालुक्यातील 1458 बागायतदार या सुपारी संघाचे सभासद असून 19 कार्यकारिणी सदस्य आहेत. या पदाधिकार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन सदस्यांचे नियंत्रण मंडळसुद्धा नियुक्त करण्यात आले आहे. ज्यांच्या बागायती आहेत, त्यांना संघाचे सभासद करण्यात आले. त्यांच्या बागायतीमधील सुपारी इतर कोणालाही न विकता फक्त सुपारी संघाकडे विकणे बंधनकारक करण्यात आले. इतरांचा हस्तक्षेप न झाल्याने संघाकडून बागायतदारांचे हित जपले गेले. सुपारीला चांगला दर मिळू लागल्याने बागायतदारांमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण आहे.

बागायतदारांकडून सुकलेली सुपारी विकत घेतल्यानंतर तालुका सुपारी खरेदी विक्री संघाला विविध प्रक्रिया कराव्या लागतात. सुकलेल्या सुपारीची साल काढणे, तिला उन्हात सुकवणे, सुपारीची प्रतवारी ठरवणे, सुपारीचे विविध गटात विभाजन करून दर्जा निश्चित करणे, प्राप्त सुपारीचे नमुने वेबसाईटवर टाकून भाव निश्चिती करणे, वेळप्रसंगी व्यापार्‍यांची भेट घेऊन चांगला भाव मिळवण्यासाठी सुपारी संघाचे संचालक प्रयत्न करीत असतात. त्यामुळे मुरूडमधील सुपारी संघाकडून बागायतदारांना चांगला भाव मिळत असतो.

मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघामुळे स्थानिकांनाही मोठा रोजगार प्राप्त झाला आहे. सुपारीची साल काढण्यासाठी महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. मुरूड तालुका सुपारी संघात विविध कामे व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाची वार्षिक उलाढाल सात कोटीच्या घरात असून, कोकणातील नामांकित सुपारी संघ म्हणून खूप आदराने पहिले जाते.

लग्नसमारंभ, तसेच विड्याचे पान, मसाले पान, गुटखा तयार करणे अशा अनेक कारणासाठी सुपारी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. बहुपयोगी सुपारीला यंदा मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाकडून प्रती मण 6400 रुपये भाव जाहीर झाला आहे. मागील वर्षी याच सुपारीला सुपारी संघाकडून प्रती मण 4120 रुपये भाव देण्यात आला होता, त्या तुलनेत यंदा दोन हजारपेक्षा जास्त दर मिळाला आहे.

मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाची वेबसाईट तयार केल्यामुळे थेट बाजारपेठ मिळाली. सुरत व अहमदाबाद येथील प्रक्रिया करणारे व्यापारी सुपारी संघाला मिळाले. सुपारी संघ थेट व्यापार्‍यांना सुपारी देत असल्याने दलाली वाचून बागायतदारांना वाढीव भाव देणे शक्य होत असल्याचे संघाचे चेअरमन महेश भगत यांनी सांगितले.

मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघामुळे आमच्या सुपारीला चांगला भाव मिळत असतो, असे नांदगाव भागातील बागायतदार विद्याधर चोरघे म्हणाले.

सुपारी खरेदी विक्री संघाची वार्षिक उलाढाल सात कोटीच्या आसपास असून सुपारीच्या उत्पन्नावर हा आकडा कमी जास्त होत असतो. सभासदांच्या सुपारीला चांगला भाव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करतात, असे संचालक आदेश दांडेकर यांनी सांगितले.

-संजय करडे, खबरबात

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply