Breaking News

सुधागडातील रस्ते चकाचक कधी होणार?

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. येथील डोंगर दर्याखोर्‍यात माळरान, पठारावर विकासाची किरणे पोहचली नाहीत. कोणत्याही विकासाचे मूल्यमापन तेथील रस्त्यांच्या प्रगतीवरून केले जाते, मात्र येथील रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाल्याचे चित्र दिसून येते. सुधागडातील रस्त्यांची पहिल्याच पावसात भयानक अशी अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. पाली खोपोली वाकण राज्य महामार्ग असेल, सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते असतील, जिल्हा परिषदेचे रस्ते असतील किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत रस्ते असतील, या रस्त्यांनी पहिल्याच पावसात दम तोडला आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरून रस्त्यांची अक्षरशः दाणादाण झालेली बघायला मिळत आहे. प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होेत आहे.

पाली खोपोली राज्य महामार्गावर मिरकूटवाडीच्या पुलाजवळ रस्त्याला भला मोठा खड्डा पडला होता. रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. याठिकाणी वाहनचालकांना रस्त्याचा शोध घेत खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान होत असून महागड्या गाड्या नादुरुस्त होत आहेत. परंतु सध्या तात्पुरत्या स्वरूपात त्याठिकाणी जीएसबी मटेरियल टाकून ते सुस्थितीत करण्यात आले आहे. बेजबाबदार प्रशासन व मुजोर ठेकेदार डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. एकंदरीत संबंधित प्रशासन ठेकेदाराला जावई बनवितात की काय असेदेखील वाटू लागल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

अशीच काहीशी परिस्थिती रासळ गावाजवळ झाली आहे. रासल गावाजवळ महामार्गाचे काम अपुरे असल्यामुळे एकेरी वाहतूक चालू आहे. तसेच वाहतूक चालू असलेली बाजू पूर्णतः पाण्याखाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्यामधून मार्ग काढताना अडचणी निर्माण होत आहेत. त्याठिकाणी अपघात होण्याचीदेखील दाट शक्यता आहे. उन्हाळ्यामध्ये झालेली रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे सगळीकडे पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत झालेले रस्ते यांचीदेखील दुरवस्था झाली आहे. नुकताच झालेला खुरावले फाटा ते वाघोशी  ग्रामसडक योजनेचा बोजवारा वाजला आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खुरावले फाटा ते वाघोशी दरम्यान  रस्त्याला जागोजागी खड्डे पडेल असून खड्ड्यांमधील खडी, माती अन्य मटेरियल बाहेर रस्त्यावर अस्थाव्यस्त पडले आहे. यामुळे अपघाती घटनांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चालना मिळत आहे.

पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण असल्यामुळे पाली या ठिकाणी शासकीय निमशासकीय कामानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. पाली येथे पाली बस स्थानक आहे. मिनिडोअर स्थानक आहे. पालीहून ठाणे , मुंबई, पुणे, पेण, महाड, खोपोली आदी ठिकाणी जाता येत असल्यामुळे वाहनांची रहदारी जास्त आहे. तसेच पाली हे अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्वराचे ठिकाण असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातुन भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु अशा मुख्यालयाच्या तसेच नगरपंचायतीच्या हद्दीतील रस्तेदेखील खड्डेमय झाले आहेत. रस्त्यावरून वाहन चालविताना खड्डेमय रस्त्यामुळे नागरीकांचा विचार करून वाहन चालवावे लागते. त्यामुळे आता खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे कळेनासे झाले आहे.

प्रवाशांचा जीवमुठीत घेऊन प्रवास

पाली खोपोली राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून रस्त्याला भेगा पडल्या आहेत. महामार्गाचे काम पूर्णत्वास देखील येत नाही तर रस्त्याची ही अवस्था यावरून रस्त्याच्या कामाचा दर्जा लक्षात येतो. पाली, जांभूळपाडा या पुलांचे काम अर्धवट असल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला चिखल तसेच दगड पसरले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अडचणी येत आहेत. शिवाय पाली आंबा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अर्धवट असल्यामुळे वाहतूक जुन्या पुलावरून चालु आहे. जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून त्याकडे ठेकेदार लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे जुन्या व जर्जर झालेल्या पुलावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय असे प्रवासी भिम महाडिक यांनी यादरम्यान बोलताना सांगितले.

-धम्मशील सावंत, खबरबात

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply