खारघर : रामप्रहर वृत्त
बेस्ट प्रशासनाकडून मुंबई विमानतळ ते खारघरदरम्यान सोमवारपासून (दि.11) बस सेवा सुरू झाली आहे. ही सेवा सुरू व्हावी, यासाठी अनेक प्रवाशांनी मागणी
केली होती. थेट विमानतळापर्यंत बेस्टची सेवा सुरू झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.
बेस्ट प्रशासनाकडून मुंबई विमानतळ ते वाशी डेपोदरम्यान वातानुकूलित बससेवा सुरू आहे. नवी मुंबईप्रमाणेच खारघरमधूनही देश-विदेशात नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेर जाणार्यांची संख्या मोठी आहे. मुंबई विमानतळावरून उबेर, ओला, टॅक्सी आदी खासगी वाहतूक सेवांकडून भरमसाठ दर आकारले जातात. त्यामुळे खारघरवासीयांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
वाशी ते मुंबई विमानतळदरम्यान धावणारी बेस्टची बस खारघरपर्यंत वाढविल्यास अधिक सोयीचे होईल, असे पत्र भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त गणेश देशमुख यांना दिले होते. याची दखल घेत पनवेल पालिकेने बेस्ट प्रशासनाकडे बस सेवा सुरू करण्याबाबत विचारणा केली होती. दरम्यान, बेस्ट प्रशासनाची ही बस सेवा खारघर ते मुंबई विमानतळदरम्यान धावली असल्याने खारघरवासी समाधान व्यक्त करीत आहे.
पनवेल महापालिकेकडून वाशी ते मुंबई विमानतळदरम्यान धावणारी बेस्ट बस खारघरपासून सुरू करावी या विषयी पत्र व्यवहार करण्यात आले होते. पत्राची दखल घेऊन खारघरपासून मुंबई विमानतळदरम्यान बस धावली ही समाधानाची बाब आहे. -डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल महापालिका
खारघर ते विमानतळ बेस्ट सुरू झाल्यामुळे खारघरवासीयांसाठी समाधानाची बाब आहे. तसेच खारघर ते मंत्रालय बेस्ट सेवा सुरू करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. -ब्रिजेश पटेल, खारघर शहर भाजप अध्यक्ष