मुरूड तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ
मुरूड : प्रतिनिधी
राज्य शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली असून, मुरूड तालुक्यात भारतीय कृषी विमा कंपनीकडून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेत सहभागीसाठी 31 जुलैपर्यंत मुदत असून अधिकाधिक शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ यांनी केले आहे.
या योजनेत खरीप हंगामासाठी भात पिकाचा समावेश असून मुरूड तालुक्यातील सर्व मंडळांना ही योजना लागू आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणार्या शेतकर्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत पात्र आहेत. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांना ऐच्छिक राहील. खरीप हंगामासाठी विमा हप्ता दोन टक्के आहे.
वेबपोर्टलवर अर्जाची सुविधा उपलब्ध
बिगर कर्जदार शेतकरी विमा संरक्षणासाठी वेब पोर्टलद्वारे थेट अर्ज भरू शकतील. त्यासाठी पिक विमा पोर्टल या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज उपलब्ध केले आहेत. विमा हप्त्याची रक्कम पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाइन भरावयाची आहे.
प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकर्यांना विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी सातबारा उतारा, आधार कार्ड, मोबाइल, बँक खात्याचा तपशील जोडणे आवश्यक आहे. पेरणी झाली असल्यास पेरणी केलेले स्वयंघोषणापत्र सादर करून प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी विमा प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.