नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार
पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विस्तार इंटरनॅशनल ग्रुपचे चीफ मेनटॉर सचिन अधिकारी आणि जिओ डिजिटल लाईफच्या सर्विस वॅलिडेशनचे उपाध्यक्ष निलेश महाजन आणि स्माईल फाउंडेशनचे संचालक डॉ. धिरज अहुजा अतिथि म्हणून उपस्थित होते.
विद्याभवन शिक्षण संकुलात सचिन अधिकारी आणि निलेश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमात नवी मुंबई महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासन यांच्याकडून आयोजित विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या संकुलातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. धिरज अहुजा यांनी स्माईल फाउंडेशनकडून शाळेतील सर्वोत्तम 15 विद्यार्थिनींना मोफत सुकन्या पॉलिसी तसेच बारावी नंतरचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स मोफत देण्याचे जाहीर केले.
सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी अधिकारी, पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक दिनेश मिसाळ, समाजसेवक गणेश भगत, राजू तिकोणे, उल्का तिकोणे व नगरसेविका रूपाली भगत आदी उपस्थित होते.