नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार
सानपाडा येथील युवा नेते पांडुरंग आमले यांनी दहीहंडी फोडणार्या पथकाला सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीची सोन्याची हंडी पारितोषिक ठेवल्याने मुंबई, ठाणेम, कल्याण-डोंबिवली, उरण-पनवेल तसेच स्थानिक नवी मुंबई परिसरातील गोविंदा पथकांमध्ये ही दहीहंडी फोडण्यासाठी स्पर्धा निर्माण होणार असल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू आहे.
सानपाडा सेक्टर 8 मधील पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या हुतात्मा बाबू गेनू मैदानावर शुक्रवारी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हा दहीहंडी उत्सव रंगणार आहे. समाजसेवक पांडुरंग आमले, भाजप प्रभाग क्रमांक 30, साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दहीहंडी फोडणार्या पथकाला सोन्याची हंडी देण्यात येणार असून सलामी देणार्या पथकांनाही रोख पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. सात थरांची सलामी देणार्या पथकाला ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई, नवी मुंबईतील नऊ गोविंदा पथकांसाठी मानाच्या अशा विशेष दहीहंडीचे आयोजन या कार्यक्रमादरम्यान केले आहे.
या कार्यक्रमात पाच अपंग विद्यार्थ्यांना सायकली भेट देवून त्यांचे पालकत्व पांडुरंग आमले या वेळी स्विकारणार आहेत. या कार्यक्रमात भाजपच्या स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री निलेश म्हात्रे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. रमेश शेटे, आज्ञा गव्हाणे, विश्वास कणसे, मंगल वाव्हळ, संचिता जोईल, प्रतिभा पवार, रुपेश मढवी, अशोक विधाते, श्रीपाद पत्की, प्रथमेश माने, विनायक काबुगडे, कैलास दळवी हे दहीहंडी उत्सवाच्या आयोजनात मेहनत घेत आहेत.