खारघर ः रामप्रहर वृत्त
खारघर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी व सागरी सुरक्षा दल यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव साजरा करताना मंडप आणि बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह देखावे, फलक व चित्रफिती करू नये, जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, तसेच आस्थापनांकडून योग्य त्या परवानगी घेऊनच उत्सव साजरा करण्याच्या सूचना खारघरमधील गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांना पोलिसांनी दिल्या आहेत.
गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, म्हणून पोलिसांनीदेखील कंबर कसली आहे. याच अनुषंगाने खारघर पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी व सागरी सुरक्षा दलाची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांना उत्सव साजरा करताना शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावेत. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील, असे आक्षेपार्ह देखावे, फलक व चित्रफिती करू नये, उत्सवासाठी जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, सर्व प्रकारच्या आस्थापनाकडून योग्य त्या परवानगी घेऊनच उत्सव साजरे करा. तसेच गणेश उत्सव मंडपाच्या आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेर्यासोबत स्वयंसेवक नेमण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. या बैठकीला सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे आदी उपस्थित होते.
ध्वनिप्रदूषण करण्याचे टाळा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ध्वनिप्रदूषणाचा उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच श्री गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन मिरवणूक विहित वेळेत सुरू करून विहित वेळेत संपवाव्यात. कोणताही अनुचित प्रकार अथवा बेवारस वस्तू व व्यक्तीच्या संशयित हालचाली निदर्शनास आल्यास तत्काळ संपर्क साधण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.