Breaking News

हरिहरेश्वर येथे आढळलेल्या बोटीचा दहशतवादाशी संबंध नाही; रायगड पोलिसांनी केले स्पष्ट

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर समुद्रकिनारी आढळून आलेल्या बोटीचा दहशतवादाशी कोणताही संबंध नाही, असे रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सागर किनार्‍यावरील रेतीमध्ये ही बोट अडकलेली असल्यामुळे प्रयत्न करूनही बोट किनार्‍यावर घेणे अथवा समुद्रामध्ये नेणे शक्य झालेले नाही. बोटीवरील सर्व साहित्याची डॉग स्कॉड आणि बीडीडीएसमार्फत तपासणी करण्यात आली आहे. बोटीवर मिळालेले शस्त्र, दारूगोळा व इतर साहित्य ताब्यात घेऊन दहशतवादविरोधी पथकामार्फत अधिक तपास करण्यात येत आहे. याबाबत मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या चौैकशीवरून या बोटीचा दहशतवादाशी  संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याचे रायगड पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील समुद्र किनार्‍यावर संशयित बोट आली होती. ही माहिती मिळताच स्थानिक पोलीस तेथे पोहचले. नागरिकांच्या मदतीन बोटीजवळ जाण्याचा प्रयत्न केला गेला, पण भरतीमुळे समुद्र खवळलेला असल्याने  बोटीजवळ जाणे शक्य झाले नाही. काही स्थानिक लोक पोहत बोटीपाशी गेले. त्यांना बोटीत काही कागदपत्रे, तसेच एक फायबरची पेटी आढळली. या पेटीत एके-56 या मॉडेलच्या तीन रायफल व एकूण 247 राउंड होते. ते सुरक्षित हरिहरेश्वर पोलीस चौकीत सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. या बोटीमध्ये आढळलेली कागदपत्रे पाहता बोटीचे नाव ‘लेडी हॅन’ असून ती एका ऑस्ट्रेलियन महिलेची आहे. त्यावर तिचा पती जॉन ग्रेटविच हा कॅप्टन व इतर सहकारी क्रू मेंबर असल्याचे कागदपत्रांवरुन समजले. बोटीबाबत केलेल्या चौकशी केली असता कॅप्टन ग्रेटविच व त्याचे सहकारी 26 जून रोजी मस्कतवरून युरोपच्या दिशेने जात असताना ओमानजवळ या बोटीचे इंजिन बंद पडले. त्यामुळे बोटीवरील क्रू मेंबरने दिलेल्या सूचनेवरून जवळ असलेल्या कोरियन नेव्हीच्या बोटीने या क्रू मेंबरना वाचवून ओमानच्या ताब्यात दिले, पण भरतीमुळे ही बोट ओमानच्या किनार्‍यावर घेऊन जाणे शक्य नसल्याने ही बोट भरकटत 18 ऑगस्ट रोजी हरिहरेश्वर किनार्‍याजवळ येवून थांबली. रायगड पोलीस दलातील श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार तसेच वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे कोस्ट गार्ड विभाग, दहशतवादविरोधी पथक, आयबी, भारतीय नौसेना, कस्टम, सागरी सुरक्षा पोलीस दल या विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट देऊन या बोटीची पाहणी केली व मार्गदर्शन केले, असेही रायगड पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply