वावे गावात जनसंघ व विचार परिवार समन्वय सदस्यांशी साधला संवाद
पाली : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रत्येक योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी तळागाळातील लाभार्थी घटकापर्यंत जाऊन काम करा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24)कार्यकर्त्यांना केले.
रायगड लोकसभा प्रवास योजना या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवारी सुधागड तालुक्यातील वावे येथे परिवार समन्वय सदस्य व कार्यकर्त्यांंशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गाव, वाड्या, वस्त्यांवर मुबलक पाणी देण्याचे मोदींचे स्वप्न साकारणार असल्याचे ना. पटेल यांनी या वेळी सागितले.
आम्ही भारत मातेच्या सेवेसाठी आहोत, गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे हीत जपणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. गरीब कल्याण अनाज योजनेच्या माध्यमातून 80 करोड नागरिकांना अन्न-धान्य पुरवठा करण्यात येतोय. जिथं जन्माला आलोय त्या गावाचा, तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला जावा, यासाठी आपण काम केलं पाहिजे असे केंद्रीय मंत्री पटेल म्हणाले.
जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून सर्वत्र प्रभावीपणे काम केले जात आहे. यावर्षी जलजीवनच्या कामांसाठी 60 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याबरोबरच पाण्याचे उपलब्ध स्त्रोत 30 वर्ष टिकून राहावेत, यासाठी अत्यंत सुक्ष्म पद्धतीने नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वळी त्यांनी विविध शासन योजनांसंबंधी लाभार्थीना मार्गदर्शन केले व जनतेशी संवाददेखील साधला. ना. प्रल्हादसिंह पटेल यांनी लाभार्थ्यांना मिळालेल्या सुविधा, त्यांना येत असलेल्या अडचणी याबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच तक्रार व शंकांचे निवारणदेखील केले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सुधागड तालुका अध्यक्ष दादा घोसाळकर, सरचिटणीस सागर मोरे, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, युवा नेते वैकुंठ पाटील, सरपंच श्रद्धा कानडे, गणेश कानडे, आलाप मेहता, शिरीष सकपाळ, केतन देसाई, रोहन दगडे, श्रीकांत ठोंबरे, गणेश सावंत, वैशाली मपारा, आरती भातखंडे, जुईली ठोंबरे आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या वेळी बहुसंख्येने उपस्थित होते.