Breaking News

कर्जतमध्ये बांबूच्या टोपल्या, सुपांना मागणी

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील पोशीर, कळंब आणि वारे या ग्रामपंचायत हद्दीतील सहा आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थ बांबूच्या पातींपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा व्यवसाय बाराही महिने करीत असतात. त्यांनी बांबूच्या पातींपासून तयार केलेल्या विविध वस्तूंना विशेषत: गणेशोत्सवाच्या काळात मागणी वाढली आहे. त्यांनी बांबूच्या पतींपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी स्थानिकांबरोबरच ठाणे जिल्ह्यातील भक्तही आवर्जून नेरळच्या बाजारात येत आहेत.

बांबूच्या पातींपासून टोपल्या, सूप आणि खेळण्यातील वस्तू बनविल्या जातात. हिंदू धर्मातील कोणत्याही कार्यासाठी बांबूच्या पातींपासून बनवलेल्या टोपल्या आणि सूप आवश्यक असते. विशेषत:  गौरी आवाहनाला नवीन टोपली आणि सूपाची गरज असते. या टोपली आणि सुपांची निर्मिती कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधव करतात. पोशीर ग्रामपंचायत हद्दीमधील गिर्‍याचीवाडी तसेच उंबरवाडी आणि चिंचवाडी येथील बहुसंख्य आदिवासी ग्रामस्थ हे बांबूच्या वस्तूं तयार करतात. या तिन्ही वाड्यांतील प्रत्येक घरात बांबूच्या वस्तू बनविण्याचे काम वर्षभर सुरु असते. त्यांच्या या वस्तूंना गणेशोत्सव काळात मोठी मागणी असते. त्यासाठी ही आदिवासी कुटुंबे एप्रिल महिन्यापासूनच बांबूच्या वस्तू तयार करण्यात गुंतलेली असतात. जंगली भागातील बांबू विकत आणून ते त्यापासून वस्तू तयार करतात.

गणेशोत्सव काळात या तिन्ही वाड्यांतील महिला या नेरळ तसेच बदलापूर, कल्याण आणि कर्जत येथील बाजारात टोपली आणि सुपे विकणायसाठी बाहेर पडतात तर पुरुष मंडळी घरातच बांबूच्या वस्तू बनविण्यात व्यस्त असतात. कळंब ग्रामपंचायत हद्दीतील भागूचीवाडी आणि वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी येथील काही आदिवासी कुटुंबेदेखील या व्यवसायात आहेत.

या आदिवासी बांधवांनी बांबूच्या पात्यांपासून तयार केलेल्या टोपल्या आणि सुप सध्या कर्जत, नेरळ, कडाव, कशेळे तसेच बदलापूर, कल्याण येथील बाजारात विक्रीसाठी आले असून, त्या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. त्यातून आदिवासी बांधवांना आर्थिक स्थिरता मिळत आहेे.

आम्ही वर्षानुवर्षे नेरळ रेल्वे स्टेशनसमोर टोपल्या आणि सुप विक्रीचा व्यवसाय करतो. पूर्वी दोन तासात त्यांची विक्री होत असायची. मात्र आता टोपल्या आणि सुप यांची विक्री कमी झाली आहे. परंतु जे निस्सीम भक्त आहेत त्यांच्याकडून नवीन टोपली आणि सुपांची मागणी कायम आहे.

-नामी नागो पारधी, ग्रामस्थ, गिर्‍याचीवाडी, ता. कर्जत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply