रेल्वे विभागाकडून लोकल प्रवाशांना सुविधा
मुंबई : प्रतिनिधी
गोरेगावपर्यंत असलेल्या हार्बर रेल्वेचा बोरीवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. एमयूटीपी-3 ए अंतर्गत हा प्रकल्प साकारण्यात येत असून या प्रकल्पात हार्बरवरील मालाड स्थानक उन्नत होणार आहे.
हार्बर मार्गावर सीएसएमटी-पनवेल, सीएसएमटी-अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावते. यापूर्वी गोरेगावऐवजी सीएसएमटी-अंधेरीदरम्यान हार्बर सेवा सुरू होती. सीएसएमटी येथून अनेक प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करून नंतर पश्चिम रेल्वेने पुढचा प्रवास करीत होते. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हार्बर सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम मार्गी लागण्यास डिसेंबर 2017 उजाडले, तर तांत्रिक कारणास्तव प्रत्यक्षात गोरेगावपर्यंत लोकल गाड्या मार्च 2019पासून धावू लागल्या. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर गोरेगावपर्यंत असलेली हार्बर सेवा बोरीवलीपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मार्गिकेच्या संरेखन योजनेवर पश्चिम रेल्वेकडून काम सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनंसपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.
गोरेगाव ते बोरीवली हार्बर मार्गासाठी उपलब्ध जागेचा विचार करता तो काही पट्ट्यात उन्नत (एलिव्हेटेड) करण्यात येणार आहे. या हार्बर मार्गिकेदरम्यान मालाड, कांदिवली दोन स्थानके असून मालाड स्थानक उन्नत होणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील सॅण्डहर्स्ट रोड, डॉकयार्ड रोड, कॉटन ग्रीन या स्थानकांपाठोपाठ पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकही भविष्यात उन्नत होईल.
संरेखनाचे काम सुरू
गोरेगाव ते बोरीवली हार्बर मार्गाच्या मार्गिकेचे जिओटेक तसेच ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सध्या संरेखन योजनेवर पश्चिम रेल्वेकडून काम सुरू भूसंपादन आराखडा आणि वृक्षतोडीचा प्रस्ताव राज्य प्राधिकरणांकडे सादर करण्यात आला आहे. कामाला मंजुरी मिळाल्यानंतर आणि राज्य सरकारकडून निधी प्राप्त होताच या मार्गिकेच्या कामांसाठी निविदा काढण्यात येणार आहे. त्यानंतर या मार्गिकेचे काम पूर्ण होण्यास साधारण तीन ते पाच वर्षे लागतील.